सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेमुळे चालू झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगांनी ‘मागील आठ वर्षांमध्‍ये साधकांना काय काय दिले’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन !

साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाच्‍या ‘अष्‍टवर्षपूर्ती’ निमित्ताने

‘भाववृद्धी सत्‍संग’ या नावाने आरंभ झालेल्‍या सत्‍संगाचा प्रथम दिवस होता ५.१०.२०१६ ! या वर्षी नवरात्रीमध्‍ये आश्विन शुक्‍ल चतुर्थीला, म्‍हणजे ७.१०.२०२४ या दिवशी सत्‍संगांच्‍या या शृंखलेला ८ वर्षे पूर्ण झाली, म्‍हणजेच या भक्‍तीसत्‍संगांची ‘अष्‍टवर्षपूर्ती’ झाली. गेल्‍या ८ वर्षांपासून प्रतिसप्‍ताह असलेल्‍या या भक्‍तीसत्‍संगांनी साधकांना भरभरून ज्ञान आणि भक्‍ती यांची भेट दिली. ‘या ८ वर्षांमधील सत्‍संग शृंखलेने साधकांना काय काय दिले ?’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन केले असता अनेक सूत्रे लक्षात आली. ती सूत्रे लेखरूपात श्री गुरूंच्‍या चरणी समर्पित करत आहे.

५ डिसेंबर या दिवशी या लेखातील काही सूत्रे पाहिली. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.                      

(भाग ४)

या लेखाचा आधीचा भाग बघण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/860432.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

५. अष्‍टसिद्धींच्‍या पलीकडे नेणे

भक्‍तीसत्‍संगांचे आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे सत्‍संगांमुळे भगवंताने आपल्‍याला अष्‍टसिद्धींच्‍याही पलीकडे नेले आहे. अष्‍टसिद्धी या आठ प्रकारच्‍या अलौकिक शक्‍ती असतात. ‘अणिमा, महिमा आणि गरिमा’ यांसारख्‍या अष्‍टसिद्धींद्वारे ‘देह ब्रह्मांडाएवढा मोठा करणे अथवा अणूएवढा लहान करणे, तो हलका अथवा जड करणे, प्राणी, पक्षी आणि मानव यांच्‍यावर नियंत्रण ठेवण्‍याची शक्‍ती प्राप्‍त करणे’, अशा सिद्धी प्राप्‍त होतात. कठोर तपस्‍या अथवा योगसाधना करून या अष्‍टसिद्धी प्राप्‍त करता येतात.

अष्‍टसिद्धी केवळ गुरुकृपेनेच प्राप्‍त होऊ शकतात आणि गुरुकृपेनेच त्‍या सिद्ध होतात. आपल्‍या साधनेच्‍या दृष्‍टीने जर विचार केला, तर गुरुदेवांनी शिकवलेली अष्‍टांग साधना अष्‍टसिद्धींपेक्षाही श्रेष्‍ठ आहे. ती अष्‍टसिद्धींच्‍याही पलीकडील आहे; कारण गुरुदेव साधकांना कोणत्‍याही सिद्धीमध्‍ये अडकू देत नाहीत. अष्‍टांग साधनेतील एकेक सूत्र गुरुदेवांनी आपल्‍या संकल्‍पशक्‍तीने सिद्ध केले आहे. त्‍यानुसार प्रयत्न केल्‍याने साधकांना निश्‍चितच मोक्षप्राप्‍ती होणार आहे. अष्‍टसिद्धी प्राप्‍त करून व्‍यक्‍तीला सर्व लोकांवर शासन करण्‍याची शक्‍ती प्राप्‍त होते, म्‍हणजे एकप्रकारे त्‍याचे सर्वांवर अधिपत्‍य निर्माण होते; परंतु श्री गुरूंनी शिकवलेली अष्‍टांग साधना केली की, त्‍या साधनेने साक्षात् जगन्‍नियंता भगवंतच प्रसन्‍न होतो आणि भक्‍ताच्‍या बंधनात बांधला जातो. भक्‍तासाठी तो काहीही करायला सिद्ध होतो. त्‍यामुळे असामान्‍य गोष्‍टी घडू लागतात, उदा. संत मीराबाईंना दिलेल्‍या विषाचे अमृतात रूपांतर झाले, तिच्‍या पायात टाकलेल्‍या काचांचे फुलांमध्‍ये परिवर्तन झाले. अलीकडच्‍या काळातील एक उदाहरण म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! एकदा शिवाजीराजे संत तुकाराम महाराजांकडे गेले असता मोगलांनी त्‍यांचा पाठलाग केला. त्‍या वेळी राजांच्‍या जिवावर बेतू नये; म्‍हणून संत तुकोबांनी विठ्ठलाचा धावा केला. त्‍या वेळी मोगलांना ‘खरे शिवाजीराजे कोण ?’, हे ओळखता आले नाही; कारण संत तुकाराम महाराजांच्‍या कीर्तनाला बसलेले सगळेच लोक शिवाजी राजांसारखेच दिसू लागले. याचा लाभ घेत खरे शिवाजी महाराज सुखरूपपणे गडावर पोचले.

यातूनच लक्षात येते की, भक्‍तीचे माहात्‍म्‍य अष्‍टसिद्धींपेक्षाही पुष्‍कळ थोर आणि श्रेष्‍ठ आहे. भक्‍तीसत्‍संगांतून हेच आपल्‍या अंतर्मनावर कोरले जात आहे की, आपल्‍याला भगवंताचे परम भक्‍त बनून सदैव त्‍याच्‍या चरणांशीच रहायचे आहे. आपल्‍याला दुसरी कोणतीच सिद्धी नको. ‘केवळ आणि केवळ भगवंताचे चरण अखंडपणे स्‍मरणे, भगवंताशी एकरूपता साध्‍य करणे’, एवढीच सिद्धी हवी आहे. अशा प्रकारे अष्‍टसिद्धींच्‍या पलीकडे नेऊन भक्‍तीचीच सिद्धी प्रदान करणार्‍या दिव्‍य भक्‍तीसत्‍संगांप्रती आपण सर्वांनी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करूया.

सत्‍संगांच्‍या संदर्भात ‘८’ या आकड्याचे आध्‍यात्‍मिक महत्त्व !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘मागील ८ वर्षांपासून ‘भावसत्‍संग’ आणि पुढे ‘भक्‍तीसत्‍संग’ असे नामकरण झालेली भावभक्‍तीची ही शृंखला निरंतर चालू आहे. ‘८’ हा आकडा आध्‍यात्‍मिकदृष्‍ट्या अत्‍यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. ‘भक्‍तीसत्‍संगांना ८ वर्षे पूर्ण होणे’, या माध्‍यमातून भगवंताची पुढील लीला लक्षात आली.

‘धर्मसंस्‍थापनेचे आराध्‍यदैवत आहेे भगवान श्रीकृष्‍ण ! त्‍यामुळे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी काळानुसार भगवान श्रीकृष्‍णाची उपासना अधिकतर करायला सांगितली आहे. भगवान श्रीकृष्‍ण ‘भक्‍तीगुरु’ म्‍हणजे भक्‍तीच्‍या संदर्भात मार्गदर्शन करणारा गुरु आहे. त्‍यामुळे भक्‍तीसत्‍संगात त्‍याचे नित्‍य अस्‍तित्‍व असते. भगवान श्रीकृष्‍ण हा श्रीविष्‍णूचा ‘आठवा अवतार’ आहे. तो देवकीचा ‘आठवा पुत्र’ आणि त्‍याची जन्‍मतिथीही ‘अष्‍टमी’च होती. अशा ‘८’ या आकड्याशी संबंधित अवतारी लीला असणार्‍या भगवंताच्‍या आठव्‍या अवताराचे, म्‍हणजे श्रीकृष्‍णाचे भक्‍तीसत्‍संगांना नित्‍य कृपाशीर्वाद लाभले आहेत.’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२६.९.२०२४)

६. अष्‍टदलकमल फुलणे

सत्‍संगांमुळे साधकांच्‍या हृदयातील अष्‍टदलकमळ फुलत आहे. अष्‍टदलकमळ म्‍हणजे आठ पाकळ्‍यांचे कमळ !

६ अ. ‘अष्‍टदलकमळ’ हे हिंदु धर्मातील एक पवित्र प्रतीक ! : ‘अष्‍टदलकमळ’ हे हिंदु धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. ते सृजनशीलता आणि नव्‍या आरंभाचे प्रतीक आहे. हिंदु धर्मात ८ दले असलेले हे कमळ ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते. याच्‍या ८ पाकळ्‍या ब्रह्मांडाच्‍या ८ दिशांचे प्रतिनिधित्‍व करतात. कमळाच्‍या मध्‍यभागी असलेले बीज म्‍हणजे ज्ञानाचे प्रतीक आहे. कमळ पाण्‍यात उगवूनही स्‍वच्‍छ रहाते. त्‍यामुळे ते सौंदर्य, शुद्धता आणि निर्मळता यांचे प्रतीक आहे.

६ आ. अनेक देवतांचे निवासस्‍थान ! : कमळाच्‍या या वैशिष्‍ट्यांमुळेच ते अनेक देवतांचे निवासस्‍थान आहे. कमलासनावर अनेक देवता आरूढ असल्‍याचे चित्र आपण पहातो, उदा. ब्रह्मदेव, तसेच महासरस्‍वती आणि महालक्ष्मी, म्‍हणजे विशेषतः देवीची विविध रूपे कमळावर विराजमान असतात.

६ इ. शीघ्र आध्‍यात्मिक प्रवासासाठी प्रेरणा देणारे अष्‍टदलकमळ ! : आपल्‍या जीवनात अष्‍टदल कमळाचे महत्त्व समजून घेतल्‍याने आपण आध्‍यात्‍मिक मार्गावर अधिक प्रगती करू शकतो. अष्‍टदलकमळ हे आध्‍यात्‍मिक प्रगतीचे प्रतीक आहे. आध्‍यात्‍मिक प्रवासात साधनेद्वारे मन शुद्ध होते आणि आपल्‍याला ज्ञान प्राप्‍त होते. हे ज्ञान ब्रह्मांडाबद्दल आणि स्‍वतःबद्दल अधिक जागरूक बनवते. अष्‍टदलकमळ हे आपल्‍याला शीघ्र आध्‍यात्मिक प्रवासासाठी प्रेरणा देते.

६ ई. साधनेमुळे देहातील चक्रस्‍थानी असलेली कमळे फुलू लागणे : आपल्‍या देहातील षड्‍चक्रांमधील प्रत्‍येक चक्रस्‍थानी एकेक कमळ असते. जेव्‍हा आपण ध्‍यानधारणा अथवा साधना करतो, तेव्‍हा साधनेद्वारे एकेक चक्र जागृत होते, म्‍हणजेच आपली कुंडलिनी जागृत होते आणि त्‍यातील कमळे एक एक करून फुलू लागतात.

भक्‍तीसत्‍संगाच्‍या या ८ वर्षांमध्‍ये गुरुकृपेने केलेल्‍या भक्‍तीप्रयत्नांमुळे साधकांच्‍या हृदयात भक्‍तीसरोवर निर्माण झाले. त्‍या भक्‍तीसरोवरात भक्‍ती आणि अष्‍टांगसाधना रूपी अष्‍टदलकमळ फुलले आहे. या भक्‍तीकमळाचा पिवळा गाभा म्‍हणजेच ज्ञान आहे. श्री गुरुदेवांच्‍या कृपेने भक्‍तीचे कमळ फुलल्‍यानंतर आता साधकांना भक्‍तीसत्‍संगांद्वारे भक्‍त्‍युत्तर ज्ञान प्राप्‍त होऊ लागले आहे. त्‍या ज्ञानभक्‍तीच्‍या मधुर रसाची आणि मकरंदाची अवीट गोडी सर्व साधकरूपी भ्रमर चाखत आहेत. साधकांच्‍या हृदयकमलात साक्षात् गुरुदेवांचे मनोहर अन् दिव्‍य रूप प्रगटले आहे. आता ते सदैव  साधकांच्‍या अंतरातच रहाणार आहे.

कृतज्ञता

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या अपार कृपेनेच साधकांना या कलियुगातही भगवंताची दिव्‍य भक्‍तीलीला प्रत्‍यक्ष अनुभवता येत असून त्‍यातील माधुर्य चाखता येत आहे. यासाठी भगवंताच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञतारूपी पुष्‍पांजली समर्पित करत आहे. ‘या भक्‍तीसत्‍संगांचा लाभ घेऊन सर्व साधकांचे जीवन भक्‍तीमय व्‍हावे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’                  (समाप्‍त)

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२६.९.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक