गुन्हा नोंद न करण्याच्या मोबदल्यात शासकीय अधिकार्‍याने हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली ५ सहस्र रुपयांची लाच !

हॉटेलमध्ये बालकामगार सापडण्याचे प्रकरण

 कार्यालयात लाच स्वीकारतांना आढाव यांना कह्यात घेतले

नाशिक – निशा बाळासाहेब आढाव या आरोपी लोकसेविकेने नाशिक येथील हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलमध्ये बालकामगार नोकरीला असल्याची बतावणी केली होती. त्याबद्दल आढाव यांनी केलेल्या अन्वेषणाच्या वेळी त्यांचा निरंक अहवाल पाठवून हॉटेल व्यावसायिकावर बालकामगार असण्याच्या संदर्भात गुन्हा नोंद न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडे पाच सहस्र रुपयांची लाच मागितली. नाशिक येथील कामगार उपायुक्त कार्यालयात लाच स्वीकारतांना आढाव यांना कह्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे.

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने ही कारवाई केली. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकीय काम करू न देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा काम केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराची कीड कधी समूळ नष्ट होणार ? यासाठी ठोस कृती आणि उपाययोजनाच हवी !