अमरावती, १५ जून (वार्ता.) – येथे दिवसेंदिवस गोहत्या आणि तस्करी यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे गोवंश संरक्षणाच्या कार्याला, तसेच विश्वकल्याणाच्या उद्देशासाठी देवतांचे आशीर्वाद मिळावे याकरता १५ आणि १६ जून या दोन दिवसांत ‘श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठान’, तसेच ‘गोरक्षा हिंदु दल’ यांच्या वतीने गोवंश संरक्षण महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय महायज्ञामध्ये प्रथम दिवशी आरंभी श्री महाकालीमाता, सर्व भक्तांची कुलदेवता यांचे पूजन, तसेच आवाहन करून गोमातेच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक करून सर्व देवतांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर ९ कुंडीय हवनात्मक यज्ञ संपन्न झाला. दुसर्या दिवशीही अशाच स्वरूपाचा यज्ञ करण्याचे प्रतिष्ठानचे नियोजन आहे.
महाशक्ती पीठाचे पिठाधिश्वर श्री १००८ श्री शक्तीजी महाराज यांनी सांगितले, ‘‘गोमातेच्या रक्षणासाठी प्रथमच यज्ञाचे आयोजन होत आहे. या यज्ञाच्या माध्यमातून सर्व गोरक्षकांना ऊर्जा मिळणार असून गोहत्या थांबवण्यासाठी महाकाली मातेचा आशीर्वाद मिळणार आहे.’’ या सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील गोरक्षक, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग घेतला.