तृणमूल काँग्रेसच्या २ गटांनी १०० ठिकाणी एकमेकांवर बाँब फेकले !

  • बंगालमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंसाचार

  • बांकुडा जिल्ह्यात पोलिसांनी केले १२ बाँब हस्तगत

कोलकाता (बंगाल) – दक्षिण परगणा जिल्ह्यातील कैनिंग शहरात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या २ गटांमध्ये हिंसाचार झाला. या वेळी १०० ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये २ गटांमधील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाँब फेकले. बंगालमध्ये ८ जुलै या दिवशी पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा हिंसाचार झाला.

१. कैनिंग शहरात पंचायत समितीची निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची सूची अंतिम करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी २ गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाँब फेकले.

२. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते सैबल लाहिडी यांच्या समर्थकांनी बसस्थानकाच्या बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक रोखली. लाहिडी यांच्या समर्थकांनी आरोप केला की, ते प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज भरायला जात असतांना तृणमूल काँग्रेसच्या दुसर्‍या गटातील कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. दुसर्‍या गटातील कार्यकर्ते हे तृणमूल काँग्रेसचे आमदार परेश राम यांचे जवळचे मानले जातात.

३. बांकुडा जिल्ह्यामध्ये पोलीस नियमितची गस्त घालत असतांना त्यांनी चारचाकी गाडीतून एक बॅग कह्यात घेतली. त्यात १२ बाँब होते. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांना अटक केली आहे.

४. राज्यात पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाने केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांना संवेदनशील जिल्ह्यांमध्ये तैनात करण्याचा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • सत्ताधारी तृणमूल काँग्रेस म्हणजे बाँब बनवणारा पक्ष ! कार्यकर्त्यांनी १०० ठिकाणी एकमेकांवर बाँब फेकले, याचा अर्थ या पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांकडे किती प्रमाणात बाँबचा साठा आहे, हे लक्षात येते. अशांचा भरणा असलेल्या समाजघातकी पक्षावर बंदी हवी !
  • एकमेकांवर बाँब फेकून हिंसाचार करणारा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हा लोकशाहीला लागलेला कलंक ! स्वतःला लोकशाहीचे पाईक समजणारे आता तृणमूल काँग्रेस करत असलेल्या या हिंसाचाराविषयी काही बोलत का नाहीत ?
  • असे कार्यकर्ते असणार्‍या सत्ताधारी पक्षाच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले, तर आश्‍चर्य ते काय ?