कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपणा सर्वांचे दायित्व ! – उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे

पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे

राजापूर – सामाजिक माध्यमांवर कोणतेही वादग्रस्त ‘मेसेज’ कुणाला पाठवू नका. त्यातून धर्माधर्मात तेढ निर्माण होईल, असे कृत्य करू नका. एकोप्याने राहून कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील ? याकडे लक्ष देणे आवश्यक असून हे आपणा सर्वांचे  दायित्व आहे, असे आवाहन येथील पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांनी केले.


तालुक्यातील पाचल येथे व्हॉट्सॲप गटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे लिखाण प्रसारित झाल्यानंतर येथील नागरिक संतप्त झाले होते. ‘छत्रपती शिवरायांच्या अवमान केला; म्हणून संबंधिताच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद होऊन कमाल प्रभूलकर याला अटक केली होती. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वातावरण शांत व्हावे, यासाठी येथील पोलीस ठाण्यामध्ये एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस उपनिरीक्षक उगले, यांसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत ‘येणार्‍या काळात विविध सणांच्या वेळी कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे’, असे आवाहन करण्यात आले. येणार्‍या पावसाळ्यात उद्भवणार्‍या संभाव्य आपत्तीविषयी या वेळी सूचना करण्यात आल्या.