बालसंस्कारासाठी थोडा वेळ काढा !

लहान मुलांवर संस्कार करणे म्हणजे काहींनी सकाळी त्यांच्याकडून स्तोत्रपठण करवून घेतले, त्यांना भ्रमणभाषवर गोष्टी उघडून दिल्या किंवा त्यांना मुलांना सांभाळणार्‍या वर्गात घातले म्हणजे झाले, असा गैरसमज आहे. मुलांवर त्यांच्या वाढत्या वयात योग्य काय आहे ? अयोग्य काय आहे ? इतरांशी कसे वागावे ? मोठ्यांशी, ज्येष्ठांशी कसे वागावे ? याचे ज्ञान करून देणे आवश्यक आहे. रामायण, महाभारत, देवता, संत यांच्या मालिका पहाण्यास निश्चित द्याव्यात; मात्र त्या प्रत्येक कथेतून काय बोध घ्यायचा ? हेसुद्धा मुलांशी चर्चा करून बिंबवावे. मुलांना या मालिकांतील कथा पाहून काय समजले ? हेसुद्धा विचारून घ्यावे. त्यांच्याशी चर्चा करावी. जेणेकरून त्यांची समजण्याची कक्षाही रुंदावत जाईल आणि ते नेमकेपणाने बोध घेऊ शकतील.

दिवसभरात त्यांच्याकडून झालेल्या कृती आणखी कशा चांगल्या करू शकतो ? हे सांगावे. त्या कृती करतांना त्यांच्याकडून झालेल्या चुका लक्षात आणून द्याव्यात. त्यांच्या चांगल्या कृतींविषयी प्रोत्साहन द्यावे आणि अयोग्य कृतींविषयी जाणीव करून द्यावी. पुन्हा पुन्हा झाल्यास शिक्षापद्धत अवलंबवावी. मुले संस्कारक्षम असल्याने हीच वेळ असते, त्यांना घडवण्याची. दैनंदिन कृतींसमवेत राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागवणार्‍या कृतीही त्यांच्याकडून त्या त्या वेळी करवून घ्याव्यात. तात्पर्य मुलांना संस्कारक्षम करण्यासाठी थोडा वेळ त्यांनाही देणे आवश्यक आहे.

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, पनवेल (२.६.२०२३)