‘पिंपळ, कडुलिंब आणि वड यांपैकी एक वृक्ष अन् चिंचेची १० झाडे किंवा कवठ, बेल अन् आवळा यांपैकी कोणत्याही जातीचे ३ वृक्ष, तसेच आंब्याची ५ झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही’, या अर्थाचे एक सुभाषित आहे.
पावसाळा जवळ आल्याने वादळी वारे वाहू लागले की, अनेक ठिकाणी मोठी झाडे पडत आहेत. याचे कारण काय ? तर विदेशी झाडे ! ती झटपट वाढतात, हिरवीगार दिसतात; म्हणून अभ्यास न करता शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आली आहेत. सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमातही ही झाडे लावली जातात. गुलमोहर हे विदेशी प्रजातीचे झाड आहे. ते दिसायला पुष्कळ मोठे, हिरवेगार आणि त्याची फुले मन मोहून टाकतात. त्यामुळे शहराचे सौंदर्यीकरण करायला हे झाड लावलेले दिसते. या झाडाला तणमूळ असतात. रस्त्याचे काम किंवा खोदकाम यांमुळे त्या मुळांचा विस्तार होत नाही, ती मुळे सैल होतात आणि जोराचा वारा, पाऊस यांमुळे ही झाडे उन्मळून पडतात. झाडाच्या रचनेनुसार पाने शेंड्याकडील भागात असतात आणि फांद्यांचा विस्तार हा ५० फुटापर्यंत होतो. त्यामुळे कालांतराने हे झाड फांद्यांचा भार सहन करू शकत नाही आणि झाड पडून अपघात होऊ शकतो. सध्या अशी अनेक विदेशी झाडे शहरात आहेत.
देशी झाडे अनेक वर्षांपासून टिकतात. सध्या वड, पिंपळ, आंबा, चिंच, कडुलिंब, कदंब, आवळा, पळस, मोह, जांभूळ इत्यादी झाडे दुर्मिळ झाली आहेत. या देशी झाडांच्या पाचोळ्यातून सेंद्रिय खत सिद्ध होते. असे खत भूमीचा कस वाढवतात. झाडाची मुळे भूमी खोलवर जाऊन माती धरून ठेवतात आणि माती वाहून जाण्यापासून वाचवतात. हवा शुद्ध करतात. पक्षांना निवारा देतात. ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा देतात. विशेष म्हणजे काही झाडे स्वतःमध्ये पालट घडवून हवेतील प्रदूषण दर्शवतात. जसे हळद, पळस हवेतील प्रदूषण मर्यादेपलीकडे गेल्यास त्यांची पाने, फुले, साल, फळे यात विकृती निर्माण होते.
ही साखळीच संपुष्टात आल्यामुळे शहराचे तापमानही वाढले आहे. पर्यावरणाचा समतोल ढळला आहे. देशी झाडांच्या लागवडीविषयी माहिती घेऊन प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन देशी अशा झाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे आणि पर्यावरण वाचवण्यात हातभार लावला पाहिजे ! तसेच सरकारच्या संबंधित विभागांना विदेशी झाडे लावण्यापासून परावृत्त करूया !
– सौ. सिद्धी सचिन सहारे, नागपूर