गोव्यात आजपासून जी-२० देशांची तिसरी आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चर कार्यकारी गटाची बैठक

पणजी, ४ जून (वार्ता.) – आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चरमध्ये सुधारणा करणे आणि जागतिक अर्थविश्‍वाच्या समस्या सोडवणे या हेतूने गोव्यात ५ ते ७ जून या कालावधीत जी-२० देशांची तिसरी आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चर कार्यकारी गटाची बैठक होणार आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चर कार्यकारी गट हा जी-२० राष्ट्रांच्या आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाचा गट आहे.

जी-२०चे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स म्हणाले, आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चरमध्ये सुधारणा करणे आणि २१ व्या शतकातील जागतिक आव्हानांना सामोरे जाणे, या दृष्टीने तिसर्‍या आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चर कार्यकारी गटाच्या बैठकीला महत्त्व आहे. गोव्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चर कार्यकारी गटाची पहिली बैठक ३० आणि ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत चंडीगड येथे, तर दुसरी बैठक ३० आणि ३१ मार्च २०२३ या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे झाली होती. या बैठकांमध्ये मल्टीलेटरल डेव्हलॉपमेंट बँक अधिक सक्षम करणे आणि कर्जाशी निगडित समस्या सोडवणे यांवर चर्चा झाली होती.