|
नवी देहली – ३ जूनला म्हणजे शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपिठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशावर सुनावणी करत त्यावर स्थगिती आणली. बलात्काराच्या एका प्रकरणात पीडितेला मंगळदोष आहे कि नाही, हे पहाण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून नोंद घेत हा निर्णय रोखला. ‘बलात्काराचे प्रकरणाशी ज्योतिषशास्त्राचा संबंध कसा ?’, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.
२३ मे या दिवशी उच्च न्यायालयाने लखनऊ विद्यापिठातील ज्योतिष विभागाच्या प्रमुखांना आदेश दिला होता की, संबंधित प्रकरणातील पीडितेला मंगळदोष आहे कि नाही, हे पडताळून सांगावे. यासाठी न्यायालयाने ३ आठवड्यांची मुदत दिली होती. आरोपी अलाहाबाद विद्यापिठाचा प्राध्यापक आहे.
काय आहे प्रकरण ?पीडितेने, ‘आरोपी युवकाने माझ्याशी विवाह करण्याचे वचन देऊन माझ्यावर बलात्कार केला’, असा आरोप केला होता. दुसरीकडे आरोपीचे म्हणणे होते की, युवती मंगळदोषाने ग्रसित असल्याने मी तिच्याशी विवाह करू शकत नाही. यावर पीडितेने म्हटले की, युवकाला माझ्याशी विवाह करायचा नाही, म्हणून तो खोटे बोलत आहे. मला मंगळदोष नाही. यावर उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला. |