आज ‘जागतिक पर्यावरणदिन’ आहे. त्या निमित्ताने…
१. पृथ्वीच्या संरक्षणाविषयी जागरूक करणारा ‘वसुंधरा दिन’ हा आधुनिक पर्यावरण चळवळीचा वर्धापनदिन !
‘सर्व ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे, ज्यावर अजूनही जीवन जगणे शक्य आहे. पृथ्वीवरील प्रदूषण आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ (जागतिक तापमान वृद्धी) न्यून करण्यासाठी किंवा तिला वाचवण्यासाठी चालू असलेल्या कार्यात एक माणूस म्हणून आपण सहभागी झाले पाहिजे; कारण पृथ्वी जर रहाण्यास योग्य राहिली नाही, तर मानवाचा विनाश निश्चित आहे. प्रदूषण आणि धुके यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी जगभरात ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त लोकांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी सरकारकडून काही मूलभूत संकल्पना निश्चित केल्या जातात. या दिनानिमित्त प्रतिवर्षी निसर्ग आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेऊन एक विशेष संकल्पना ठरवली जाते अन् त्यानुसार उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातात. या वेळी जागतिक ‘वसुंधरा दिना’ची संकल्पना ‘इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट’ (आमच्या ग्रहावर गुंतवणूक करा) अशी होती. ‘अर्थ डे’ किंवा ‘वसुंधरा दिन’ हा शब्द जगासमोर आणणारी पहिली व्यक्ती ज्युलियन कोनिग होती. खरे तर २२ एप्रिल या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. या कारणास्तव त्यांनी या दिवशी पर्यावरण संरक्षणाशी संबंधित चळवळ चालू केली आणि त्याला ‘वसुंधरा दिन’ असे नाव दिले. वसुंधरा दिन आपल्याला हरित समृद्धीने जीवन समृद्ध करण्यासाठी प्रोत्साहित करतो. आपले आरोग्य, कुटुंब, आपली उपजीविका आणि आपले ग्रह यांचे एकत्रितपणे संरक्षण करण्याची हीच वेळ आहे, असा संदेश ही संकल्पना देते. ‘वसुंधरा दिन’ हा आधुनिक पर्यावरण चळवळीचा वर्धापनदिन आहे, जो प्रथमच वर्ष १९७० मध्ये साजरा करण्यात आला. पर्यावरणाविषयी लोकांना संवेदनशील बनवणे आणि पृथ्वीच्या संरक्षणाविषयी जागरूक करणे, हा त्याचा उद्देश आहे.
२. पृथ्वीच्या विनाशासाठी केवळ मानव उत्तरदायी !
पृथ्वीचा विनाश, निसर्ग प्रदूषण आणि जैविक संकट यांविषयी जगात बरीच चर्चा होत असते. वृक्ष हा मानव, प्राणी किंवा इतर सजीव यांची सर्वांत मूलभूत आवश्यकता आहे. तो आपल्याला अन्न, प्राणवायू, निवारा, इंधन, औषधे, सुरक्षा आणि फर्निचर देतो. पर्यावरण, जलवायू, हवामान आणि वातावरण यांच्यात नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी वृक्ष अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे जंगलतोड थांबवून आणि वनीकरणाला प्रोत्साहन देऊन वन्यजिवांची काळजी घेतली पाहिजे.
आज जगात सर्वत्र निसर्गाचे शोषण चालू आहे. त्यामुळे उत्तर ध्रुवावरील अनेक किलोमीटरपर्यंत बर्फ वितळणे, सूर्याची अतीनील किरणे (अल्ट्राव्हायोलेट रे) पृथ्वीवर येण्यापासून थांबवणार्या ‘ओझोन’च्या थराला छिद्रे पडणे, भीषण वादळे, त्सुनामी आणि इतर अनेक नैसर्गिक आपत्ती इत्यादींसाठी केवळ मानवच उत्तरदायी आहे. जे आज ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या रूपाने आपल्यासमोर आहे.
३. नैसर्गिक संपत्तीचा अनाठायी वापर केल्याने जल, जंगल आणि भूमी धोक्यात
पृथ्वीवर अशीच संकटे येत राहिली, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा पृथ्वीवरील प्राणी आणि वनस्पती यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. जीव-जंतू आंधळे होतील. लोकांची त्वचा जळू लागेल आणि कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढेल. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे किनारी भाग असुरक्षित होतील. कोरोना महामारीसारखे रोग जीवन संकटात आणत रहातील. जल, जंगल आणि भूमी या ३ घटकांपासून पृथ्वी अन् निसर्ग निर्माण झाला आहे. या तीन घटकांखेरीज पृथ्वी आणि निसर्ग अपूर्ण आहे. बहुतेक जेथे हे तीन घटक विपुल प्रमाणात आहेत, ते देश जगातील समृद्ध देश समजले जातात. हे प्रकरण मूलभूत घटक किंवा संसाधने यांच्या उपलब्धतेपुरते मर्यादित नाही. आधुनिकीकरणाच्या या युगात या साधनसंपत्तीचा अनाठायी वापर होत असतांना हे घटकही धोक्यात आले आहेत. अनेक शहरे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. तुम्हीच सांगा तो माणूस कुठे हरवला आहे, जो स्वत:ला कापूनही झाडे तोडण्यापासून थांबवत होता ? चराऊ भूमीचा एक तुकडाही त्याने कुणाला बळकावू दिला नाही, ज्याच्यासाठी पाण्याचा एक थेंबही जीवनासारखा अनमोल होता, पशूवधगृहामध्ये मारल्या जाणार्या गायींचे निष्पाप उसासे त्याला अस्वस्थ करत असत. ज्याने वन्य प्राणी आणि पक्षी यांना हुसकावून लावत आपली वस्ती बनवण्याचा संकुचित स्वार्थ जपला नाही. आता तोच मनुष्य त्याचा स्वार्थ आणि सोयीसुविधा यांसाठी निसर्गाचे नीट रक्षण करू शकत नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती पुन्हा पुन्हा जनजीवन उद़्ध्वस्त करत असते.
४. ‘ग्लोबल वॉर्मिग’ हा जागतिक चिंतेचा विषय
वाळवंटातील पुराविषयी बोलणे विचित्र आहे; परंतु राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये पुराची भीषण स्थिती आपण पाहिली आहे. जेव्हा मानव पृथ्वीचे रक्षण करू शकत नाही, तेव्हा पृथ्वीही अनेक नैसर्गिक आपत्तींच्या रूपाने तिचे रौद्र रूप दाखवत असते. तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्याला शुद्ध पाणी, शुद्ध हवा, सुपीक भूमी, शुद्ध वातावरण आणि वनस्पती मिळणार नाही. या सर्वांखेरीज आपले जीवन जगणे कठीण होऊन जाईल. आज युद्ध, मानवाधिकार, जगातील कोणतीही राजकीय घटना किंवा कोणत्याही देशाचे संरक्षण हा चिंतनाचा विषय नाही. उष्णतेने भयंकर आणि भीषण रूप धारण केले आहे, आकुंचन पावणारे जलस्रोत, विनाशाकडे ढकलली जाणारी पृथ्वी आणि निसर्ग नष्ट करण्याचे प्रयत्न, ही चिंतन अन् चिंता यांची गोष्ट आहे. वाढती लोकसंख्या, वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्हास, प्रदूषित वायूंनी ओझोनच्या आवरणाला छेद देणे, निसर्गाचे आणि पर्यावरणाचे अत्याधिक शोषण होणे, या सर्व गोष्टी पृथ्वी अन् पृथ्वीवासीय यांच्यासाठी सर्वांत मोठे धोके आहेत. या धोक्याची जाणीव करून देणे, हेच ‘जागतिक निसर्ग संवर्धनदिना’चे उद्दिष्ट आहे. प्रतिवर्षी पृथ्वीचे तापमान वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे, भूमी अल्प होत आहे, प्रत्येक वस्तूची उपलब्धता अल्प होत आहे आणि प्राणवायूची कमतरता आहे. यासमवेतच आपल्या जीवनशैलीमुळे पर्यावरण आणि निसर्ग यांसाठी गंभीर धोका निर्माण होत असल्याचे समोर येत आहे.
५. प्रदूषण थांबवण्यासाठी अतिशयोक्तीपूर्ण औद्योगिक क्रांतीला नियंत्रित करणे आवश्यक !
हवामान पालट हे आज पृथ्वीवरील सर्वांत मोठे संकट बनले आहे. पृथ्वीच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तर मानवी जीवन सुरक्षित आणि संरक्षित कसे रहाणार? पृथ्वी असली, तर सर्व घटक असतात; म्हणूनच पृथ्वी एक अमूल्य तत्त्व आहे. त्यावर आकाश, जल, अग्नी आणि वायू ही तत्त्वे आहेत. या सर्वांच्या मिश्रणामुळे निसर्गाची रचना सुंदर आणि जिवंत बनते. स्वतःच्या स्वार्थासाठी पृथ्वीवर होणारे अत्याचार थांबवले पाहिजेत आणि कार्बन उत्सर्जन न्यून करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अतिशयोक्तीपूर्ण औद्योगिक क्रांतीला नियंत्रित करावे लागेल; कारण त्यांच्यामुळेच कार्बन उत्सर्जन आणि इतर प्रकारचे प्रदूषण वाढले आहे. आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी माणूस निसर्गाचे शोषण करत असल्याचे दिसून आले आहे. निसर्गाची अशीच कुचंबणा होत राहिली, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा आपले जीवन जगणे कठीण होईल.
आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यात प्रामुख्याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्कतपणे दुरुपयोग होत आहे. त्यामुळे ही संसाधने हळूहळू संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. सर्व देशांची सरकारे आणि विविध अराजकीय संघटना यांनी निसर्गाच्या संवर्धनाला अतिशय गांभीर्याने घेतले आहे, तसेच त्यावर काम चालू केले आहे. असे अनेक मार्ग आहेत, ज्यांच्या माध्यमातून सामान्य माणूसही पर्यावरण संवर्धनाचे दायित्व पार पाडू शकतो.’
– श्री. ललित गर्ग
(साभार : पाक्षिक ‘हिंदु विश्व’, १६ ते ३१ मे २०२३)