नवी मुंबईत सांडपाण्‍यावर घेतले जाते भाज्‍यांचे पीक !

शारीरिक त्रास होऊनही तक्रार केलेली नाही !

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई – नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्‍वेच्‍या स्‍थानकांलगत पिकणार्‍या पालेभाज्‍या या गटाराच्‍या पाण्‍यावर पिकवण्‍यात येत आहेत आणि किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालक यांना त्‍या विकल्‍या जात आहेत. आता ही भाजी वाशीतील ए.पी.एम्.सी.च्‍या बाजारातही विकली जाऊ लागली आहे. नवी मुंबई, मुंबई आणि उपनगर येथील किरकोळ भाजी विक्रेते बाजारातून ही भाजी विक्रीसाठी नेत आहेत. जुईनगर, तुर्भे ते एरोली, मानखुर्द, ठाणे, कल्‍याण, भिवंडी भागातील रेल्‍वे रूळालगत नाल्‍यातील सांडपाण्‍यावर पिकवली जाणारी या बाजारात विकण्‍यास ठेवली जाते.

सांडपाण्‍यावर पिकवल्‍या जाणार्‍या भाज्‍यांमुळे आरोग्‍यावर दुष्‍परिणाम होण्‍याची भीती आहे. भाज्‍यांसाठी सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असलेले सांडपाणी वापरले जाते; मात्र ‘या भाज्‍यांचा शरिरावर घातक परिणाम होतो’, असे तज्ञांचे मत आहे. पालक, चवळी, भेंडी, लाल माठ, माठ, मुळा, कांद्याची पात आदी भाज्‍यांचा समावेश आहे.

सांडपाण्‍यातील रसायने आणि विषारी वायू यांचे होणारे दुष्‍परिणाम !

या सांडपाण्‍यात वेगवेगळ्‍या प्रकारची रसायने, विषारी वायू, शौचालयाचे सांडपाणी अशी शरिरास अपाय करणारी द्रव्‍ये असतात. यातील प्रामुख्‍याने नायट्रोजन, शिसे, फॉस्‍फरस आणि इतर अशी विषारी द्रव्‍ये शरिराला अपायकारक आहेत. नायट्रोजन लालपेशीमध्‍ये प्रवेश करून प्राणवायूच्‍या पुरवठ्यात अडथळे निर्माण करतो. शिसे आणि इतर जडधातू रोगप्रतिकारक शक्‍ती क्षीण करते. तसेच या भाज्‍या खाणार्‍यांना श्‍वसनाचे आजार होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. अमिबासारखे जीव गाजर किंवा मुळा यांसारख्‍या केशमुळातून शरिरात जातात. त्‍यामुळे लहान मुलांना अतिसाराचा त्रास होण्‍याची शक्‍यता असते. सामान्‍य नागरिकांना या भाज्‍या खाऊन शारीरिक हानी होत असल्‍याचे लक्षात येऊनही कुणीही तक्रार करण्‍यास पुढे येत नाही.

संपादकीय भूमिका :

ज्‍या गोष्‍टी जनतेच्‍या आरोग्‍याशी खेळणार्‍या आहेत, त्‍यावर सरकार स्‍वतःहून का कारवाई करत नाही ?