जर्मनीत यापुढे रशियाचे दोन दूतावास चालू ठेवण्यास अनुमती !

रशियाने जर्मनीला दूतावासांची संख्य अल्प करण्याच्या दिलेल्या तंबीला जर्मनीचे प्रत्युत्तर !

बर्लिन (जर्मनी) – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध याआधीच लादले आहेत. अशातच रशियाने त्यांच्या देशातील जर्मन दूतावास आणि अन्य राजनैतिक केंद्रे अन् तेथे काम करणारे कर्मचारी यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याविषयी जर्मनीला सांगितले आहे. रशियाच्या आदेशामुळे जर्मनीला कालिनिनग्राद, येकातेरिनबर्ग आणि नोवोसिबिर्स्क येथील दूतावास बंद करावे लागणार आहेत. जर्मनीला आता रशियातील केवळ मॉस्कोतील दूतावास आणि सेंट पीटर्सबर्ग येथील वाणिज्य दूतावासच चालू ठेवता येणार आहे. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल जर्मनीनेही रशियाच्या ५ पैकी ४ दूतावास बंद करण्याचा आदेश दिला आहे.

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते क्रिस्टोफर बर्गर म्हणाले की,

१. रशियन सरकारने नुकतेच रशियातील सांस्कृतिक केंद्रे आणि शाळा येथे काम करणारे जर्मन लोक अन् जर्मन अधिकारी यांची संख्या ३५० पर्यंतच ठेवण्याविषयी सांगितले आहे.

२. जर्मनीतही यापुढे केवळ बर्लिनमधील रशियन दूतावास आणि आणखी एक वाणिज्य दूतावास यांचेच संचालन करण्याची रशियाला अनुमती दिली जाईल.

३. युद्धामुळे दोन्ही देशांतील अनेक द्विपक्षीय वाटाघाटींना आता कोणताही आधार राहिलेला नाही. रशियाने घेतलेल्या या भूमिकेमुळेच आम्हालाही तशी भूमिका घेणे भाग आहे.