भारत हा विकसनशील आणि गरीब देशांचा नेता !

पापुआ न्यू गिनी देशाचे पंतप्रधान जेम्स मारेप यांचे विधान

पोर्ट मोरेस्बी – भारत हा ‘ग्लोबल साऊथ’चा, म्हणजेच विकसनशील आणि गरीब देशांचा नेता आहे, असे विधान पापुआ न्यू गिनी या देशाचे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी येथे केले. आपण सर्व जण विकसित देशांच्या ‘पॉवर प्ले’चे बळी आहोत, असेही त्यांनी सांगितले. ते येथे २२ मे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलंड को-ऑपरेशन’ या परिषदेच्या उद्घटन सत्रात बोलत होते. या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

कोरोना काळात आम्ही ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला, ते संकटकाळात आमच्या समवेत उभे राहिले नाहीत ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘कोरोनाचा सर्वाधिक परिणाम विकसनशील आणि गरीब देशांवर झाला. आधीच त्यांच्यासमोर हवामान पालट, नैसर्गिक आपत्ती, भूक, दारिद्य्र आदी आव्हाने होती. आता त्यांच्यासमोर नवीन समस्या निर्माण होत आहेत. कोरोना काळात आम्ही ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला, ते संकटकाळात आमच्या समवेत उभे राहिले नाहीत. कठीण काळात भारत पॅसिफिक बेटांवरील देशांच्या पाठीशी उभा राहिला. कोरोना प्रतिबंध लसीद्वारे भारताने सर्व सहकारी मित्रांना साहाय्य केले. भारतासाठी पॅसिफिकमधील बेटे हे छोटे बेटांचे देश नसून मोठे सागरी देश आहेत.’’

भारत आणि पापुआ न्यू गिनी यांच्या द्विपक्षीय चर्चा !

पंतप्रधान मोदी यांनी जेम्स मारापे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आरोग्य, कौशल्य विकास, गुंतवणूक आणि आयटी क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवले जाईल, असे दोन्ही पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी टोक पिसिन भाषेतून तमिळमध्ये भाषांतर केलेल्या ‘थिरुकुरल’ या पुस्तकाच्या अनुवादित आवृत्तीचे लोकार्पण केले. टोक पिसिन ही पापुआ न्यू गिनीची भाषा आहे. पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेड यांचीही भेट घेतली.

पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांकडून मोदी यांचे चरणस्पर्श करून स्वागत !

२१ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. राजधानी पोर्ट मोरेस्बी येथे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करून स्वागत केले. यानंतर विमानतळावरच पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ (विशेष सन्मान) देण्यात आला. वास्तविक, या देशात सूर्यास्तानंतर कोणत्याही परदेशी पाहुण्यांचे विशेष सन्मानाने स्वागत केले जात नाही; परंतु भारताचे महत्त्व लक्षात घेऊन तेथील सरकारने स्वतःची परंपरा मोडली. पापुआ न्यू गिनी या इंडो पॅसिफिक प्रदेशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.