बुरख्याआडचे भयावह काळे सत्य मांडणारा अस्वस्थ अनुभव !
अनेकदा ऐतिहासिक आणि सत्य घटनांवरील चित्रपटांतील दाखले आणि संदर्भ आपणाला ठाऊक असतात. ‘द केरल स्टोरी’ हा असा चित्रपट आहे की, ज्याचे कथानक तर सत्य घटनेवर आधारित आहे; परंतु त्यांच्या भयावहतेपासून भारत आणि जग अनभिज्ञ आहे !
प्रेमाच्या जाळ्यात फसवून ‘इस्लामिक स्टेट’सारख्या धोकादायक आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी नेण्यात आलेल्या १-२ नव्हे सहस्रावधी हिंदु आणि ख्रिस्ती युवतींचा ‘लव्ह’पासून ते ‘जिहाद’पर्यंत भयावह प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. प्रेमाचा उपयोग ‘जिहाद’साठी कसा करण्यात येतो, हे दाखवणारे ‘कुर्बान’सारखे काही चित्रपट यापूर्वी येऊन गेले आहेत; मात्र ‘लव्ह जिहाद’चे वस्तूनिष्ठ वास्तव मांडणारा हा पहिला चित्रपट ठरावा !
‘सीरिया’मध्ये ‘इस्लामिक स्टेट’ या जगातील सर्वाधिक क्रूर आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी केरळमधून नेण्यात येणार्या काही हिंदु आणि ख्रिस्ती मुलींपैकी शालिनी उन्नीकृष्णन् ही युवती अफगाणिस्तान सीमाभागातून आंतकवाद्यांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी ठरते. या वाळवंटात संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेच्या हाती ही युवती सापडते. स्वत:सह आपल्यासारख्या सहस्रावधी युवतींना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी करून घेण्यात आल्याविषयी तिने सांगितलेली कथा म्हणजे हा चित्रपट होय.
काय आहे चित्रपटाची कथा ?
केरळमधील थिरूवनंतपूरम् येथे रहाणारी शालिनी उन्नीकृष्णन् घरापासून दूर असलेल्या परिचारिकेचे प्रशिक्षण देणार्या महाविद्यालयात शिक्षणासाठी जाते. महाविद्यालयाच्या वसतीगृहात ती ३ मैत्रिणींसह रहात असते. यांतील एक मैत्रीण ख्रिस्ती, दुसरी साम्यवादी विचारांचा पगडा असलेल्या हिंदु कुटुंबातील, तर तिसरी मैत्रीण आसिफा नावाची मुसलमान असते. आसिफा या तिन्ही मैत्रिणींना मुसलमान युवकांच्या संपर्कात आणते. त्यानंतर अमली पदार्थांचे सेवन, प्रेमाचे खोटे जाळे त्यातून शारिरीक संबंध प्रस्थापित करून युवतींना गरोदर करणे, त्यांचा बुद्धीभेद (ब्रेनवॉश) करणे आदी क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यांना आकृष्ट करण्यासाठी मुसलमान युवकांना धडे दिले जातात. गरोदर झाल्यावर विवाह करण्याविना त्यांच्यापुढे कोणताही पर्याय न ठेवणे आणि विवाहापूर्वी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करणे अशा षड्यंत्रात त्यांना खेचले जाते. यानंतर ‘भारतातून त्यांना सीरियापर्यंत कसे नेले जाते आणि त्यांचा उपयोग कसा केला जातो ?’, याचे हृदयद्रावक चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
‘हिंदु युवती जिहादला बळी का पडल्या ?’ याचे वास्तव !
शालिनी उन्नीकृष्णन् ही हिंदु धार्मिक कुटुंबातील, तर गीतांजली मेमन ही हिंदु असूनही साम्यवादाचा पगडा असलेल्या कुटुंबातील असते. स्वत:च्या धर्माविषयीचे ज्ञान नसल्यामुळे अर्थात् धर्मशिक्षण नसल्यामुळे मैत्रिण आसिफाद्वारा हिंदु धर्माविषयी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यातून केला जाणारा बुद्धीभेद याला त्या दोघीही बळी ठरतात. या उलट ख्रिस्ती असलेली त्यांची मैत्रिण ख्रिस्ती धर्मानुसार आचरण करते. त्यामुळे ती जिहादच्या जाळ्यात अडकत नाही; मात्र तिला अमली पदार्थांच्या साहाय्याने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. विवाहपूर्वी शारिरीक संबंध प्रस्थापित करणे, ‘हिंदु धर्मातील संस्कार म्हणजे बुरसटलेले विचार’, असे वाटून ते झिडकारणे यातूनच त्यांचा लव्ह जिहादकडे जाणारा आणि त्यातून पुढे आतंकवादाकडे जाणारा मार्ग चालू होतो. याचे भीषण स्वरूप चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
युवतींच्या इसिसपर्यंतच्या प्रवासाचे भयावह वास्तव !
स्वत:चे सर्वस्व गमावून बसलेल्या, आतंकवाद्यांसमवेत राहिलेल्या, मुले जन्माला घातलेल्या या मुलींना एकतर आत्महत्या करणे किंवा आतंकवाद्यांसमवेत आयुष्य घालवणे हे दोनच पर्याय शिल्लक रहातात.
चित्रपट प्रदर्शित होऊन दोनच दिवस झाल्यामुळे चित्रपटाचे पूर्ण कथानक उघड करणे उचित होणार नाही; मात्र चित्रपटाच्या पुढील भागात युवतींचा बुद्धीभेद, धर्मांतर, वासना शमवण्यासाठी आतंकवाद्यांनी वेश्येलाही लाजवेल अशा प्रकारे त्यांचा घेतलेला उपभोग आणि आतंकवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग याची कथा चित्रपटाच्या पुढच्या भागात आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया !
चित्रपटाचा मध्यंतर, तसेच चित्रपट संपल्यानंतर काही प्रेक्षकांशी संवाद साधला असता बहुतांश प्रेक्षकांनी ‘हे वास्तव सर्वांपर्यंत पोचणे आवश्यक आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
उत्कृष्ट निर्मिती !
वास्तव मांडतांना कथानक कंटाळवाणे होणार नाही, हे निर्मात्यापुढे आव्हान असते. ‘द केरल स्टोरी’ मधून हे आव्हान चांगल्या प्रकारे पेलले आहे. या चित्रपटामध्ये अदा शर्मा वगळता एकही प्रथितयश कलाकार नसतांना नवख्या कलाकारांचा अभिनय अत्यंत उत्कृष्ट आहे. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही कलाकाराची ‘ओव्हर अॅक्टींग’ दिसून येत नाही. दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांची ही उत्कृष्ट निर्मिती म्हणता येईल. अदा शर्मा, योगिता बिलानी, सोनिया बानी आणि सिद्धी इदनानी यांनी साकारलेली पात्रे उत्कृष्ट आहेत. चित्रपटाचे कथानक कुठेही न भरकटता शेवटपर्यंत प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवणारे आहे. केरळपासून ते अफगाणिस्तानच्या सीमाभागाच्या चित्रीकरणातून चित्रपटाची भव्यता वाढते.
अंतर्मुख करणारा चित्रपट !
‘ना जमी मिली, ना फलक मिला, है सफरमे अंधा परिंदा । जिस राहकी मंजिल नही, वही खो गया होके गुमराह ॥’ या गीताचे बोल चित्रपटाचा कथानकाला प्रभावशाली करतात. ‘ज्या ठिकाणी जात आहोत, त्याविषयी यत्किंचितही माहिती नसतांना स्वत:चे आई-वडील, स्वधर्म यांसह सर्वस्व सोडून कुणी असे अपरिचित व्यक्तीसमवेत जाते का ?’, हा या गीताचा मतितार्थ विचार करायला प्रवृत्त करतो. ‘चित्रपटासाठी मोजलेल्या पैशांतून मनोरंजन झाले का ?’, असा प्रश्न कुणी विचारला, तर चित्रपट पहाणार्याला ‘मनोरंजन’ हा विषय गौण वाटावा आणि ‘राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करायला तो प्रवृत्त व्हावा’, असा हा चित्रपट आहे, हे मात्र निश्चित सांगता येईल.
भावनिक चित्रपट असल्याचा अपप्रचार !
देशातील लव्ह जिहादच्या भयावह वास्तवतेचा अपलाप करण्यासाठी किंवा त्याचे गांभीर्य नष्ट करण्यासाठी हा चित्रपट भावनिक असल्याचा अपप्रसार विरोधकांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात ‘मागील १० वर्षांत केरळमधील ३२ सहस्रांहून अधिक युवती अशा प्रकारे बेपत्ता झाल्या आहेत’, हे सत्य आहे. हे गंभीर भयावह वास्तव असूही भावना भडकावण्याचा प्रयत्न चित्रपटातून कुठेच दिसत नाही. उलट प्रेमाच्या जाळ्यात सहस्रावधी युवतींना फसवण्याचे हे भावनिक प्रसंग वास्तववादी स्वरूपात दाखवण्याचा निर्मात्याचा प्रयत्न प्रामाणिक वाटतो !
इस्लामविरोधी नव्हेच !
‘आतंकवाद, जिहादी वृत्ती हा भाग इस्लामशी संबंधित आहे’ ही वस्तूस्थिती जगापुढे स्पष्ट आहे; मात्र असे असूनही चित्रपटात ‘उगाचच इस्लामची अपकीर्ती होणार नाही’, याची काळजी घेण्यात आल्याचे दिसून येईल; मात्र असे असले, तरी ‘इस्लाममधील चुकीच्या प्रवृत्तीवर धार्मिक भावना न दुखवता वस्तूस्थिती दाखवण्याचा प्रयत्नही निर्मात्यांनी निर्भिडपणे केला आहे’, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे मुसलमानांनाही हा चित्रपट इस्लामच्या विरोधी वाटण्यापेक्षा ‘इस्लामिक स्टेट’सारख्या आतंकवादाची संघटनेची भयावहता दर्शवणारा वाटेल, अशी आशा वाटते.
चित्रपटावर बंदीची मागणी कितपत योग्य ?
‘इस्लामची अपकीर्ती करण्यासाठी आणि हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावण्यासाठी ही खोटी पटकथा बनवण्यात आली’, असा आरोप काहींकडून केला जात आहे. ‘ही पटकथा खोटी आहे’, असे ज्यांना वाटत आहे, त्यांनी यामागील सत्यता पडताळण्याची मागणी खरे तर जोरकसपणे करायला हवी. अकबर आणि जोधा यांच्या काल्पनिक प्रेमकथेवर चित्रपट येतो. त्या वेळी तो कलास्वातंत्र्याच्या नावाखाली खपवला जातो, ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर मात्र बंदीची मागणी होते, हे काही योग्य नाही. कोणत्याही धर्माचे विकृतीकरण किंवा इतिहासाची तोडफोड हे कधीही समर्थनीय होऊ शकत नाही; मात्र इतिहासातील विकृतपणाला वाचा फोडू नये, असाही याचा अर्थ होत नाही.
जन्मदाते आई-वडील आणि कुटुंबीय हेच काय, तर स्वधर्म सोडून इसिसमध्ये एक नव्हे, सहस्रावधी मुली जाणे आणि त्यातही उच्चशिक्षित युवती असणे, हे खरे तर विश्वासार्ह वाटत नाही; परंतु ज्या कुटुंबियांच्या संदर्भात हे घडले त्याचे वास्तव चित्रीकरण चित्रपटात दाखवण्यात आले आहे, हेही नाकारता येत नाही. शेवटी केरळमधील युवतींशीच नव्हे, तर आतंकवादाकडे नेणार्या एका अपरिचित मार्गावर हा चित्रपट प्रकाशझोत टाकतो. त्यातील सत्यता पडताळणे, हेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे खरे तर विरोध करण्यापेक्षा बुद्धीजीवींनी यामागील वास्तव समजून घेणे हेच उचित ठरेल. चित्रपटाची कथा सत्य वाटणारे आणि कथानक अतिरंजित वाटणारे असे दोन्ही गट असणे स्वाभाविकच आहे; मात्र या दोन्ही विचारधारांनी हा चित्रपट अवश्य पहावा. त्यावर चिंतन करावे आणि यामागील सत्यता पडताळण्याची मागणी सरकारकडे करावी, हे खरे तर उचित राहील. विविध विचारधारांचा विरोध आणि समर्थन करतांना राष्ट्राच्या सुरक्षितेचे सूत्र सुटू नये, एवढेच !
चित्रपटाचे यश !
भारतातील बुद्धीजिवी, पुरोगामी मंडळींनी ‘असे काही नाहीच’ म्हणून प्रथमपासूनच ‘लव्ह जिहाद’ ही गोष्ट नाकारली. मुसलमानांच्या संदर्भातील कथित गोष्टींसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणार्या मानवाधिकारवाल्यांनी याविषयी मौन बाळगले; मात्र या चित्रपटातील माहिती अत्यंत वस्तूनिष्ठ, पुराव्यांसह मांडलेली असून ती ‘लव्ह जिहाद’चे अस्तित्व नाकारणार्यांच्या कानाखाली सणसणीत चपराक ठरते ! हा चित्रपट हिंदु तरुणींचा आक्रोश अधोरेखित करतोच, त्यासह तो प्रेक्षकांना वास्तवाचे भान आणून देतांना भविष्याचा विचार करायलाही भाग पाडतो. या चित्रपटात भयाण वास्तव मांडले जात असतांना तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला पहिल्यापासून गुंतवून ठेवतो. अनेकदा प्रेक्षकांना तो अस्वस्थ करतो. ‘‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलींची तगमग, हाल, छळ इत्यादी पहातांना हृदय पिळवटून निघते’, असे एका प्रेक्षकाने सांगितले. म्हणजेच या तरुणींच्या नरकयातना प्रभावीपणे प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोचवण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे.
हिंदूंना आवाहन !
हा चित्रपट प्रत्येक हिंदूने आणि विशेषतः हिंदु महिलांनी अवश्य पहायला हवा ! हिंदूंनो, आपल्या शेजारी-पाजारी असलेल्या हिंदु महिलांमध्ये ‘लव्ह जिहाद’विरुद्ध प्रबोधन करा ! कोणतीही तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत असल्याचे लक्षात आल्यास वा धर्मांध तरुण-तरुणींशी तिची जवळीक वाढत असल्यास तिला सोडवण्याविषयी स्थानिक हिंदुत्वनिष्ठांचे साहाय्य घ्या ! याविषयी सविस्तर माहिती हिंदु जनजागृती पुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ या ग्रंथात दिली आहे. ती वाचून योग्य त्या कृती करून संपूर्ण हिंदु समाजावरील या संकटाला परतवून लावण्यासाठी संघटित प्रयत्न करा ! तरच काही अंशी तरी या चित्रपटाचा उद्देश यशस्वी झाला, असे म्हणता येईल !
– श्री. प्रीतम नाचणकर, प्रतिनिधी, सनातन प्रभात, मुंबई.
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पुढील सूत्रे अधोरेखित करण्यात यशस्वी झाला आहे !१. हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देण्याची तीव्र आवश्यकता स्पष्ट करणे ! २. धर्मांधांकडून हिंदु धर्म, देवता यांविषयी केला जाणारा अपप्रचार लोकांपर्यंत पोचवणे ! ३. धर्मांधांकडून मुस्लीमेतर तरुणींना उद्ध्वस्त करण्यासाठी वापरण्यात येणारा बुद्धीभेद (ब्रेनवॉश), उथळ प्रेम, ‘ब्लॅकमेल’, शारीरिक अन् मानसिक शोषण इत्यादी दुष्कृत्यांचा बुरखा फाडणे ! ४. धर्मांधांच्या निर्दयतेची परिसीमा ! ५. ‘इस्लामिक स्टेट’ची दाहकता सर्वार्थाने महिला आणि पुरुष यांसाठीही मारकच ! ६. कोणत्याही स्पष्ट उल्लेखाविना ‘लव्ह जिहाद’वर उपाययोजना म्हणून हिंदूंना धर्मशिक्षण देणे, कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन असणे, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्ते सत्तेत असणे आवश्यक आहे’, असे हा चित्रपट स्पष्ट करतो. – श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा |
‘द केरल स्टोरी’मधील वास्तवाचे भान आणणारे काही संवाद !१. ‘केरळसारखे राज्य २० वर्षांत ‘इस्लामिक स्टेट’ बनू शकते’, असे एका माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले असतांना त्याकडे दुर्लक्ष का करता ?’ २. ‘१० वर्षांत केरळमधून ३२ सहस्र तरुणी हरवल्या. त्यांच्यापैकी केवळ ८१५ जणींच्या विषयी हरवल्याच्या तक्रारी आल्या आणि केवळ २५१ तरुणींचाच शोध लागला !’ ३. ‘केरळमधील धर्मांध तरुण अन्य देशांतील आतंकवादी आक्रमणांत सापडत असतांना शासनाला धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी आणखी कोणते पुरावे हवेत ?’ ४. ‘न्यायालय पुराव्यांवर चालते; मात्र ते वस्तूस्थितीचा विचार कधी करेल का ?’ – श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा |