वेल्हे तालुक्याचे नामांतर ‘राजगड’ तालुका असे करावे !

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

श्री अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

पुणे – राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे शासन चालवले. वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या भावना राजगडाशी जोडल्या आहेत; म्हणूनच वेल्हे तालुक्याचे नामकरण हे ‘राजगड’ असे करण्यात यावे, अशी नागरिकांची तीव्र इच्छा आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

याविषयी तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींनी नामकरणासाठी सकारात्मक ठराव दिला आहे, असेही पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यापूर्वी वेल्हे तालुक्याचे नामांतर ‘राजगड’ करण्यात यावे, अशी मागणी केली होती.

अजित पवारांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वेल्हे तालुका हा शिवकालीन आणि ऐतिहासिक वारसा असलेला अन् किल्ले मालिकेतील किल्ले राजगड आणि किल्ले तोरणा असे २ महत्त्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पहाता किल्ले तोरणाचे नाव ‘प्रचंडगड’ या नावाने तालुक्याची ओळख होती; पण सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असल्याने तालुक्याचे नाव ‘वेल्हे’ असे नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले राजगडावरून या तालुक्याचे नामकरण ‘राजगड’ करण्याविषयीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी.