रशियाकडून भारताला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा ठप्प !

अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचा भारत आणि रशिया यांच्यातील शस्त्रांच्या व्यवहारावर परिणाम

मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर आक्रमण करून चालू केलेल्या युद्धानंतर अमेरिकेसह अनेक पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा फटका भारतालाही बसला आहे. आता रशियाने भारताच्या शस्त्रांंची आयात रोखली आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे भारताला रशियाकडून सैनिकी सामानांची खरेदी करता येत नाही. रशियाने १ सहस्र कोटी रुपयांचे सुट्टे भाग आणि ‘एस्-४००’ क्षेपणास्त्रे यांची आयातही भारताला केलेली नाही. यामागे आर्थिक कारण आहे. रशिया भारतीय रुपयांत पैसे घेण्यास सिद्ध नाही, तर भारत रूबलमध्ये (रशियाचे चलन) पैसे देण्यास सक्षम नाही. त्यामुळे या दोन्ही देशांतील शस्त्रांचा व्यवहार ठप्प पडला आहे. ‘ब्लूमबर्ग’ नियतकालिकाकडून हे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.

या संदर्भात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्को दौर्‍याच्या वेळी याविषयावर चर्चा केली होती. यासह रशियाचे उपपंतप्रधान आणि भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्यातही याविषयी चर्चा झाली होती. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांमध्ये आता दिरहाम (संयुक्त अरब अमिरातचे चलन) आणि युरो (युरोपचे चलन) या चलनांद्वारे व्यवहार करण्याविषयी चर्चा चालू आहे.