विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व !

‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी ‘विवाहसंस्कार’ हा महत्त्वाचा आहे. विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याची पद्धत आहे. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.

१. विवाह निश्चित करतांना कोणत्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे ?

विवाह निश्चित करतांना जोडीदाराचे कुल (घराणे), विद्या (बुद्धीमत्ता आणि शिक्षण), वय, शील (प्रकृती आणि स्वभाव), धन (अर्थार्जन करण्याची क्षमता), रूप (शारीरिक स्थिती) आणि रहाण्याचे ठिकाण यांची स्थिती विचारात घ्यावी. याविषयी काही विवेचन पुढे दिले आहे.

अ. वर आणि वधू समान कुलातील असल्यास दोन्ही घराण्यांचे कुलाचार, चालीरीती, कुटुंबियांची मानसिकता, कुटुंबियांची वैचारिक पातळी आदींमध्ये सारखेपणा असल्याने दांपत्याला एकमेकांशी आणि कुटुंबियांशी जुळवून घेण्यास सुलभ जाते.

आ. मुलासाठी २५ ते ३० वर्षे आणि मुलीसाठी २० ते २५ वर्षे हे वय विवाहासाठी योग्य समजले जाते.

इ. ‘मुलगा आणि मुलगी यांची प्रकृती आणि स्वभाव एकमेकांशी किती प्रमाणात जुळतो ?’, हे कळण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे साहाय्य घेतले जाते.

ई. पती-पत्नीचे गुण, कर्म आणि स्वभाव यांत सारखेपणा असल्यास त्यांच्याद्वारे उत्पन्न होणारी संतती त्यांच्याहून श्रेष्ठ गुणांनी संपन्न असते.

२. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्यामागील उद्देश

श्री. राज कर्वे

‘वर आणि वधू यांची प्रकृती आणि स्वभाव एकमेकांना पूरक असावेत’, हा जन्मकुंडल्या जुळवण्यामागील उद्देश आहे. असे दांपत्य जीवनातील समस्यांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतील. व्यक्तीची प्रकृती आणि स्वभाव जन्मकुंडलीवरून चांगल्या प्रकारे समजतो. त्यामुळे विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याची पद्धत आहे.

३. विवाह प्रारब्धाधीन आहे, तर जन्मकुंडल्या पहाण्याची आवश्यकता काय ?

हिंदु धर्मातील तत्त्वज्ञानानुसार व्यक्तीचा जन्म, विवाह आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात. असे असतांना ‘विवाहासंदर्भात जन्मकुंडल्या पहाण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न पडू शकतो. सध्याच्या काळानुसार मानवाचे प्रारब्ध ६५ टक्के असून क्रियमाण कर्म ३५ टक्के आहे. विवाह प्रारब्धानुसार असला, तरी ‘योग्य जोडीदार मिळण्यासाठी प्रयत्न करणे’ हे आपले क्रियमाण कर्म आहे. ज्याप्रमाणे मनुष्य निरोगी रहावा यासाठी आयुर्वेदात व्यायाम, योग्य आहार-विहार आदींचे पालन करण्यास सांगितले आहे, त्याप्रमाणेच वैवाहिक जीवन सुखी असावे; म्हणून सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी जन्मकुंडल्या जुळवण्यास सांगितले आहे.

बुद्धीला कळण्यास कठीण असणार्‍या काही गोष्टी, उदा. व्यक्तीच्या प्रारब्धाची तीव्रता, व्यक्तीला असणारा सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादींचा बोध जन्मकुंडलीद्वारे होतो. जन्मकुंडल्या पाहिल्यामुळे व्यक्तीला तिच्या जोडीदाराची प्रकृती ठाऊक होऊन तिला समजून घेण्यासही साहाय्य होते.

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०२२)