शासनाने नोंद न घेतल्यास ११०० गायी पशूसंवर्धन विभागाकडे देणार
खेड – तालुक्यातील लोटे येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान’ संचालित गोशाळेच्या जागेचा प्रश्न न सुटल्याने गोशाळेचे प्रमुख आणि कीर्तनकार ह.भ.प. भगवान कोकरे यांनी १० एप्रिलपासून आमरण उपोषण चालू केले आहे. या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. ‘येत्या ५ दिवसांत शासनाने उपोषणाची योग्य ती नोंद न घेतल्यास गोशाळेतील ११०० गायी पशूसंवर्धन विभागाकडे देऊ’, अशी चेतावणी कोकरे यांनी या वेळी दिली आहे.
कीर्तनकार ह.भ.प. भगवान कोकरे म्हणाले की,
१. गोशाळेत सध्या ११०० गायी आहेत. त्यांच्या वैरणीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कीर्तनसेवेतून या गायींची सेवा केली जाते; मात्र त्यांचा दिवसाचा खर्च अनुमाने ६० सहस्र रुपये येतो. त्यामुळे हा खर्च परवडत नाही. गेल्या२ वर्षांपासून शासनाने कुठलेही साहाय्य केलेले नाही.
२. वर्ष २०१७ मध्ये या गोशाळेसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘गोवर्धन गोवंश सेवाकेंद्रा’कडून निधी संमत झाला. त्यांपैकी मिळालेल्या ७५ टक्के रकमेतून संस्थेने गोशाळेसाठी आवश्यक बांधकामे केली आहेत; मात्र गेल्या ४ वर्षांपासून संमत निधीपैकी उर्वरित असेलेली २५ टक्के रक्कम प्राप्त झालेली नाही.
३. गेल्या अनेक वर्षांपासून या गोशाळेला जागेचा पाठपुरावा चालू आहे, तोही सुटत नाही. यासाठी फेब्रुवारी मासात उपोषण केल्यानंतर शासन स्तरावरून जागेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र त्याचे पालन झाले नसल्यामुळे पुन्हा उपोषण चालू करावे लागले.
४. या उपोषणात जयश्री कोकरे यांच्यासह गोशाळेचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत, तसेच अनेक गोभक्तांसह लोकप्रतिनिधींनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
५. राज्य वारकरी संप्रदायाचे प्रमुख ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी ‘गोशाळेला साहाय्य आणि जागा प्रश्न का सोडवत नाही ?’, असा प्रश्न पत्राद्वारे शासनाला केला आहे. तसेच कोकरे यांनाही पत्र पाठवून उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.
संपादकीय भूमिकागायींच्या संवर्धनासाठी उपोषण करावे लागणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! |