हनुमान जयंतीच्या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्री. दीपक छत्रे यांना आलेल्या अनुभूती !

श्री. दीपक छत्रे

१. हनुमान जयंतीच्या दिवशी अकस्मात् एक माकड उडी मारून साधकाच्या चारचाकी गाडीवर बसणे आणि ‘नामाची आठवण करून देण्यासाठी हे घडले असेल’, असा साधकाचा भाव असणे 

‘१६.४.२०२२ या दिवशी हनुमान जयंती होती. दुसर्‍या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन होता. हनुमान जयंतीच्या दिवशी मी कामावरून दुपारी २ वाजता बाहेर पडलो. माझी मुलगी कु. अवनी प्रतिदिन पणजीहून बसने याच सुमारास फर्मागुडी (गोवा) येथे पोचते. ती आल्यावर नेहमीप्रमाणे आम्ही मनोमन प्रार्थना केली आणि घरी जाण्यासाठी निघालो. एवढ्यात अकस्मात् शेजारच्या झाडावरील एक माकड उडी मारून आमच्या चारचाकी गाडीवर बसले. मी अवनीला म्हणालो, ‘‘आज हनुमान जयंती आहे.’’ अधिक विचार न करता मी मनोमन हनुमंताला साष्टांग दंडवत घातला. अंदाजे ३० सेकंद ते माकड चारचाकी गाडीवर बसले होते. ‘या मूढ जिवाला नामाची आठवण करून देण्यासाठी हे घडले असेल’, असा भाव मी ठेवला.

२. ‘प्रत्यक्ष हनुमंतच ‘तुमच्यावर कृपा आहे’, हे सांगण्यासाठी वानराच्या रूपातून आले’, असे प.पू. दास महाराज यांनी सांगणे

त्याच दिवशी दुपारी ४ नंतर मी आणि अवनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सेवा करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात गेलो. आपल्याला जे कळत नाही, ते संतांना विचारावे; म्हणून मी सेवा करून घरी आल्यावर प.पू. दास महाराज यांना भ्रमणभाषद्वारे फर्मागुडी येथे घडलेला प्रसंग सांगितला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘त्या ठिकाणी अनेक गाड्या असतांना नेमके तुमच्या गाडीवरच ते माकड चढून का बसले ? ते माकड म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत होते. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाची सेवा, म्हणजेच श्रीरामाची सेवा ! ‘माझी तुमच्यावर कृपा आहे’, असे आश्वस्त करण्यासाठीच मारुतिराया आला होता.’’

३. प.पू. दास महाराज यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना साधकाला आलेली अनुभूती

‘प.पू. बाबांच्या (प.पू. दास महाराज यांच्या) प्रत्येक शब्दागणिक माझ्या शरिराच्या अणूरेणूत चैतन्य भिनत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी निर्विचार अवस्था झाल्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही. प.पू. बाबांनीच मला भानावर आणले.’

– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, फोंडा, गोवा. (२२.४.२०२२)