कबुतरांच्या विष्ठेतून रोगांचा प्रसार : दाणे घालणार्‍यांकडून दंडाची वसुली !

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – के.ई.एम्. रुग्णालयातील श्‍वसनविकार चिकित्सा आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कबुतरांची विष्ठा आणि पंख यांमध्ये ‘फंगल स्पोअर्स’ (बुरशी उत्पन्न करणार्‍या पेशी) आढळून आले आहेत. यामुळे माणसांना ‘एक्सट्रेंसिक अ‍ॅलर्जिक अ‍ॅलव्होलिटीस’ हा विकार होऊ शकतो. खोकला, दमा, ऑक्सिजनची पातळी न्यून होणे ही या विकाराची लक्षणे आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पक्षांना खायला घालणार्‍यांना उपद्रव माजवल्याच्या कारणावरून ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २४ मार्च दिवशी विधान परिषदेत दिली.

भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी कबुतरांद्वारे रोगांचा प्रसार होत असल्याचे सूत्र उपस्थित करत कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती. यावर उत्तर देतांना उदय सामंत म्हणाले, ‘‘कबुतरखान्यांना ‘प्राचीन वारसा’ हा दर्जा देण्यात आलेला नाही, तसेच तसा दर्जा देताही येणार नाही. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, जी.पी.ओ., एन्.एस्. रोड पेट्रोलपंप, ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, नवजीवन सोसायटी, मलबार हिल, एम्.एस्. अली रोड जंक्शन आणि दादर या प्रमुख ठिकाणी कबुतरखाने आहेत. अनेक वर्षांपासून येथे कबुतरांना दाणे खायला घातले जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६’नुसार अघोषित क्षेत्रात पक्षी वा प्राणी यांना खायला घातल्यास ‘सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवणे’ या कलमाच्या अंतर्गत दंड आकारला जातो. मागील ३ मासांत सार्वजनिक ठिकाणी पक्षांना खायला घालणार्‍यांकडून १० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.’’