भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगात सर्वोत्कृष्ट ! – मेग जोन्स

 – मेग जोन्स, प्रमुख, युनायटेड नेशन्स वुमेन्स एम्पॉवरमेंट

  • ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची पद्धत घातक  !

  • एकत्र कुटुंबपद्धतीच्या र्‍हासात सर्व समस्यांचे मूळ !

मेग जोन्स, प्रमुख, युनायटेड नेशन्स वुमेन्स एम्पॉवरमेंट

नागपूर –  एकत्र कुटुंबपद्धतीवर आधारित भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगात सर्वोत्कृष्ट आहे. जगभरात वाढत असलेली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची पद्धत घातक असून एकत्र कुटुंबपद्धतीच्या र्‍हासामध्ये अनेक समस्यांचे मूळ आहे. जगासमोर विविध संकटे असतांना कुटुंबव्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षातून अनेक समस्या निर्माण होत आहेत, असे मत ‘युनायटेड नेशन्स वुमेन्स एम्पॉवरमेंट’च्या प्रमुख आणि भारतीय संस्कृतीने प्रभावित झालेल्या अन् भारतीय महिलांचा अभ्यास असणार्‍या मेग जोन्स यांनी व्यक्त केले. ‘सी-२० समिट’साठी त्या नागपूर येथे आल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. त्या मूळच्या ऑस्ट्रेलियन वंशाच्या आहेत.

सरकारने एकत्र कुटुंबपद्धतीसाठी पुढाकार घ्यावा !

जोन्स पुढे म्हणाल्या की,

१. एकत्र कुटुंबपद्धतीच्या संस्कारांचा जगभरात प्रचार-प्रसार व्हायला हवा, तसेच भविष्यातील आव्हाने लक्षात घेता सरकारी यंत्रणांनीदेखील यासाठी पुढाकार घ्यायला हवा. पती-पत्नी आणि मुले एवढेच कुटुंबात असल्यास अनेक समस्या निर्माण होतात. मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, तर महिलांना घरी थांबावे लागते. यातून त्यांच्या हक्काच्या आणि प्रगतीच्या अनेक संधी हातातून निघून जातात. याचा फटका महिला सक्षमीकरणाला बसतो. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी अशा कुटुंबांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’वर आधारित रोजगार निर्मितीवर भर द्यायला हवा.

२. जगातील अनेक देशांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ कागद काळे-पांढरे करण्यात येत आहेत; मात्र भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना चालू करून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला आहे. यातून ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांनीही शिकण्याची आवश्यकता आहे.

३. महिला सक्षमीकरणाच्या योजनांविषयी जगातील अनेक देश उदासीन आहेत. तेथे योजनांची कार्यवाही होत नाही. जगभरात महिलांसाठीच्या योजनांचे दायित्व निश्‍चित होऊन गरजूंपर्यंत त्या योजना पोचणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

जे विदेशी लोकांना कळते, ते येथील पुरो(अधो)गामी आणि सुधारणावादी यांना कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !