हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नागपूर येथे मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या भव्‍य अधिवेशनाचे आयोजन !

मंदिर विश्‍वस्‍तांची दुसरी बैठक पार पडली !

बैठकीत उपस्‍थित असलेले मंदिर विश्‍वस्‍त

नागपूर, १ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील तात्‍या टोपे नगरच्‍या श्री गणेश मंदिरात नागपूरमधील मुख्‍य मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत नागपूरमध्‍ये मंदिर विश्‍वस्‍तांचे भव्‍य अधिवेशन आयोजित करण्‍याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला. या बैठकीला तात्‍या टोपेनगरमधील श्री गणेश मंदिर, प्रतापनगरचे श्री दुर्गादेवी मंदिर, मारुतीनगरचे श्री हनुमान मंदिर रमणा, रामनगरचे श्रीराम मंदिर, नरेंद्रनगरचे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, गोविंद प्रभुनगरचे हनुमान मंदिर या मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांसह १८ विश्‍वस्‍त, मंदिरांचे सेवक, तसेच समितीचे श्री. अतुल अर्वेनला आणि श्री. आशिष नागपूरकर उपस्‍थित होते.

या वेळी प्रत्‍येकाने त्‍यांच्‍या भागातील ५ मंदिरांना एकत्र करणे, हिंदूंना धर्मशिक्षण देण्‍यासाठी मंदिरातधर्मशिक्षण वर्ग चालू करणे, मंदिरातील सूचना फलकावर नियमित धर्मशिक्षणाचे लिखाण करणे, मंदिरात देवतांची माहिती असलेले फ्‍लेक्‍स लावणे, तसेच आरतीच्‍या वेळी थोडा विषय मांडणे, मोठ्या मंदिराच्‍या परिसरातील लहान मंदिरांना एकत्र करून आठवड्यातून एक दिवस सर्वांनी सामूहिकपणे आरती करणे, असेही निर्णय घेण्‍यात आले.

विशेष

पुढील बैठक ५ मार्च या दिवशी स्‍थानिक मारुतिनगरमधील श्री हनुमान मंदिर रमणा येथे आयोजित करण्‍याचे ठरले आहे.

क्षणचित्र

मंदिर परिषदेसाठी सभागृह आणि अन्‍य व्‍यवस्‍था करण्‍याची सिद्धता उपस्‍थित विश्‍वस्‍तांनी दाखवली.