डॉक्टर स्पर्श न करता रुग्णांची तपासणी करू शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – रुग्णांना स्पर्श न करता डॉक्टर रुग्णांची वैद्यकीय तपासणी करू शकत नाही, असे मत केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीवर मांडले.

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची वैद्यकीय तपासणी करणार्‍या डॉक्टरला मारहाण केली होती. डॉक्टरने पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोप या व्यक्तीने केला होता. या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

उच्च न्यायालयाने म्हटले की, रुग्णांवर उपचार करण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॉक्टरांनी शक्ती आणि वेळ घालवलेला असतो. रुग्णांना स्पर्श न करता डॉक्टर रुग्णांची वैद्यकीय तपासणी करू शकत नाहीत. जर एखादा रुग्ण स्वत:वर उपचार करून घेऊ इच्छित असेल, तर त्याने डॉक्टरांच्या स्पर्शाचे फार अवघड वाटून घेऊ नये. स्पर्श न करता उपचार करणे डॉक्टरांसाठी अवघड आहे. रुग्णाच्या हृदयाचे ठोके तपासणे आणि मूल्यांकन करणे, यांसाठी रुग्णाच्या छातीच्या डाव्या भागावर ‘स्टेथोस्कोप’ लावावा लागतो; मात्र अशी प्रकरणे न्यायालय पूर्णपणे फेटाळू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.