देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआयकडून चौकशी

देहली मद्य घोटाळा प्रकरण

नवी देहली – आम आदमी पक्षाचे नेते आणि देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची देहली मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात आली. तत्पूर्वी सिसोदिया यांनी राजघाट येथे जाऊन म. गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि नंतर त्यांच्या समर्थकांनी ‘रोड शो’ केला. या वेळी पोलिसांनी कलम १४४ (जमाव बंदी) लागू करून आपच्या कार्यकर्त्यांना अटक केली.

चौकशीविषयी सिसोदिया म्हणाले की, मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. संपूर्ण अन्वेषणात मी पूर्ण सहकार्य करेन. मला काही मास कारागृहात रहावे लागले, तरी मला त्याची काळजी नाही. मी भगतसिंह यांचा अनुयायी आहे. देशासाठी भगतसिंह यांना फाशी देण्यात आली. घोटाळ्याच्या खोट्या आरोपांमुळे कारागृहात जाणे ही अतिशय छोटी गोष्ट आहे.