‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व’ याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे

सौ. मंदाकिनी कदम

१. नमस्कार करतांना ‘डावा हात म्हणजे व्यष्टी साधना आणि उजवा हात म्हणजे समष्टी साधना !’, असा विचार मनात येणे

‘एक दिवस दुपारी नामजप करण्यापूर्वी मी देवाला संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना केली. हात जोडून नमस्कार करतांना देवाने मनात आणले, ‘हे दोन्ही हात एकत्र जुळवून जी मुद्रा तयार होते, ती म्हणजे नमस्कार. डावा हात म्हणजे व्यष्टी साधना आणि उजवा हात म्हणजे समष्टी साधना !’

२. दोन्ही हात जुळवून केलेला नमस्कारच ईश्वरापर्यंत पोचत असणे

प्रत्येकासाठी आपला उजवा हात महत्त्वाचा आहे. आपण उजव्या हाताचा वापर ७० ते ७५ टक्के आणि डाव्या हाताचा वापर साधारणपणे २५ ते ३० टक्के करत असतो. काही जणांच्या संदर्भात याच्या विरुद्ध असते. डावखुर्‍या व्यक्तींच्या डाव्या हाताचा वापर ७० ते ७५ टक्के आणि उजव्या हाताचा वापर २५ ते ३० टक्के होत असतो. हे दोन्ही हात जुळवून केलेला नमस्कारच ईश्वरापर्यंत पोेचतो.

३. व्यष्टी आणि समष्टी साधना गांभीर्याने केल्यानेच मनुष्य जीवनाचे सार्थक होत असणे

देव, संत आणि गुरु यांच्या चरणी जो नमस्कार केला जातो, त्यामध्ये नम्रता आणि लीनता व्यक्त होत असते. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी दोन्ही हातांची आवश्यकता असते. व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व अधिक आहे. व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने अन् गांभीर्याने केल्यानेच परमेश्वराच्या कृपेने मिळालेल्या मनुष्य जीवनाचे सार्थक होते, आपल्याला परमेश्वराच्या (गुरुदेवांच्या) चरणांपर्यंत गतीने पोेचता येते आणि आपली आध्यात्मिक प्रगतीही जलद होते.

४. व्यष्टी साधना हा पाया असल्याने ‘व्यष्टी साधना चांगली असेल, तर समष्टी साधना चांगली होणारच’, हा दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करणे आवश्यक !

व्यष्टी साधना, म्हणजे स्वतःची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी करावयाचे प्रयत्न. व्यष्टी साधनेचे महत्त्व डाव्या हाताप्रमाणे, म्हणजे ३० टक्के असले, तरी ती महत्त्वाची आहे; कारण इमारतीचा पाया भक्कम असेल, तरच त्याच्यावर इमारत भक्कम बांधली जाते. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी व्यष्टी साधना हा पायाच आहे. ‘व्यष्टी साधना चांगली असेल, तर समष्टी साधना चांगली होणारच’, हा दृष्टीकोन ठेवावा. व्यष्टी साधनेमध्ये ज्या सूत्रांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे, त्या सूत्रांचे गांभीर्य वाढवून त्यांना अपेक्षित अशी व्यष्टी साधना करण्याचे प्रयत्न करूया.

५. परात्पर गुरुदेवांनी सांगितलेली व्यष्टी साधना !

५ अ. नामजप : भावपूर्ण नामजप होणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्याला पुष्कळ उदाहरणे ठाऊक आहेत. नामजप केल्याने वाल्याचे वाल्मीकि ऋषि झाले. आपण सर्वसामान्य जीव आहोत. जो देवाचे नाव जेवढ्या श्रद्धेने घेईल, तेवढी त्याची वृत्ती सात्त्विक होऊन देव त्याला तारणार आहे. नाम घेतल्याने स्वभावदोष आणि अहं न्यून होण्यासही साहाय्य होणार आहे.

५ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया प्रत्येकाने मनापासून राबवून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. हे प्रयत्न करून आपल्यातील सत्त्वगुण वाढेल आणि १०० टक्के सात्त्विक अशा परमेश्वराच्या (प.पू. गुरुदेवांच्या) चरणांपर्यंत लवकर पोचता येऊन प्रत्येक अज्ञानी, अडाणी आणि क्षुद्र जिवाला मोक्षप्राप्ती होईल, तसेच परमेश्वराच्या कृपेने मिळालेल्या मनुष्यजन्माचे सार्थक करता येईल.

५ इ. भावजागृतीसाठी प्रयत्न : ‘भाव तिथे देव’, या उक्तीप्रमाणे जसा भाव असेल, तशा त्याला अनुभूती येत असतात. दिवस उगवल्यानंतर मी पहिला नमस्कार माझ्या परमेश्वररूपी आणि कृष्णसमान गुरुमाऊलींना करते. माझा ‘या गुरुमाऊलीमध्ये माझा श्रीकृष्ण आहे’, हाच भाव सातत्याने रहातो. तो परमेश्वर सदैव माझ्या समवेतच असतो अन् मला सदैव परमेश्वराचे (गुरुमाऊलीचे) अस्तित्व जाणवते.

५ ई. प्रार्थना आणि कृतज्ञता : भावपूर्ण प्रार्थना ईश्वराच्या चरणांपर्यंत पोेचते. तेव्हा शरणगतभावाने प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.

६. साधकांनी परात्पर गुरुदेवांनी सांगितलेले अष्टांग साधनेचे प्रयत्न केल्यास प्रत्येकामध्ये श्रीकृष्णाचे, म्हणजे परात्पर गुरुमाऊलीचे रूप पहाता येईल !

परात्पर गुरुमाऊलींनी अष्टांग साधना सांगून सर्व अज्ञानी साधकांना परमेश्वराच्या चरणांशी पोचण्याचा मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावर एक पाऊल टाकल्यावर त्यांच्या कृपेने आपण पुढे-पुढे जाणारच आहोत. सर्व साधकांनी त्यांना अपेक्षित अशी व्यष्टी साधना होण्यासाठी संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना करून प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत अन् परमेश्वरप्राप्तीची तळमळ वाढवायला हवी. त्यामुळे आपल्याला प्रत्येकामध्ये श्रीकृष्णाचे, म्हणजे परात्पर गुरुमाऊलीचे रूप पहाता येईल.

७. ‘ईश्वराने मला शिकवण्यासाठी आणि माझे प्रारब्ध न्यून करण्यासाठीच त्या व्यक्तीच्या माध्यमातून प्रसंग घडवला आहे’, असा भाव ठेवला, तर स्वभावदोष आणि अहं न्यून होऊन गुणांची वृद्धी होईल !

आपण जेव्हा एखाद्याकडे ‘व्यक्ती’ म्हणून पहातो, तेव्हा आपले स्वभावदोष आणि अहं उफाळून येऊ शकतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात प्रसंग घडतो, तेव्हा ‘त्या व्यक्तीमध्ये श्रीकृष्णच आहे’, असा भाव ठेवला, तर त्या प्रसंगाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो. ‘ईश्वराने मला शिकवण्यासाठी आणि माझे प्रारब्ध न्यून करण्यासाठीच त्या व्यक्तीच्या माध्यमातून हा प्रसंग घडवला आहे’, असा भाव ठेवला, तर स्वभावदोष आणि अहं न्यून होऊन गुणांची वृद्धी होईल’, हे मी अनुभवले आहे.

८. समष्टी साधना समाजाशी निगडित असल्याने ती करण्यासाठी प्रथम स्वतः आदर्श साधक बनणे आवश्यक असणे

समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न. ‘समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे’, हे गुरुदेवांच्या कृपेने सर्वांना समजले आहे. व्यष्टी साधना केवळ स्वतःपुरती मर्यादित असते; पण समष्टी साधना सर्व समाजाशी निगडित असते. व्यष्टी साधनेतील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न प्रामाणिकपणे झाले नाहीत, तर स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू उफाळून येतात. त्यांतील काही पैलू समष्टीला घातक असतात. तेव्हा आपण गुरुदेवांचे आदर्श साधक कसे होणार ? आदर्श साधक होण्यासाठी आणि आपल्यामध्ये साधकत्व येण्यासाठी आपली व्यष्टी साधना गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्याचे ध्येय प्रत्येकाने ठेवले पाहिजे, तरच सेवा परिपूर्ण, भावपूर्ण आणि चुकांविरहित होईल. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जी चार ऋणे फेडावी लागतात, त्यांतील एक ‘समाजऋण’ आहे. समष्टी साधना आणि सत्सेवा करून या ऋणांतून आपण मुक्त होऊ शकतो.

९. प्रामाणिकपणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करून ईश्वराच्या चरणांपर्यंत पोचता येणे

आपल्याला परमेश्वराच्या कृपेने हा मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. गुरुदेवांनी सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला ईश्वराच्या चरणांपर्यंत लवकर पोेचता येईल अन् त्यांचे मन जिंकता येऊन आपल्यावर अखंड गुरुकृपा होईल.

गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् । (म्हणजे गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते.)’, असे म्हटले आहे. ‘ते किती सार्थ आहे !’, हे ध्यानात येते. यासाठी आपला मनोलय आणि बुद्धीलय व्हायला पाहिजे.

१०. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून परात्पर गुरुमाऊलींचा सत्संग मिळत आहे’, असा भाव ठेवावा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) यांच्याकडून साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन मिळत आहे. ‘त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष परात्पर गुरुमाऊलीचा सत्संग मिळत आहे’, असा भाव ठेवूया.

‘हे भगवंता, ‘तुझ्या कृपेने माझ्या मनात व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी योग्य विचार आले आणि तूच माझ्याकडून हे लिहून घेतले’, यासाठी तुझ्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मंदाकिनी कदम (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१५.२.२०१७)                                                     ०