पाकिस्तानने अणूबाँब विकणे जगासाठी धोकादायक !

पाकिस्तानची परिस्थिती पुष्कळ वाईट आहे. त्यांना चीन किंवा मुसलमान राष्ट्रे यांच्याकडून पैसा मिळत नाहीे. तसेच जगातील सर्वांत मोठी आर्थिक संस्था ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ ही त्यांना पैसे देण्यास सिद्ध नाही. त्यामुळे पैसे उभे करण्यासाठी पाकिस्तान त्यांच्याकडील अणूबाँब आणि अण्वस्त्रे विक्री करू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तान त्याची अण्वस्त्रे ही मुसलमान राष्ट्रे किंवा आतंकवादी संघटना यांना विकू शकेल. त्यामुळे अणूबाँबचा धोका सर्व जगाला निर्माण होऊन जगाची शांतता भंग होईल. या सर्वांचे विश्‍लेषण या लेखात पाहूया.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

१. पाकिस्तानकडून कोणता देश अणूबाँब खरेदी करील ?

पाकिस्तानची स्थिती अत्यंत वाईट असल्याने तो त्याच्याकडील अणूबाँब कुणाला विकू शकेल? हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. पाकिस्तानने अणूबाँब बनवायचे सूत्र (फॉर्म्युला) आणि त्यासाठी लागणारे प्लुटोनियम चोरी करून करून मिळवले होते. त्यामुळे पाकिस्तान अशा प्रकारचे अणूबाँब विकू शकेल, ही शक्यता नाकारता येत नाही. मुसलमान राष्ट्रे शिया आणि सुन्नी या दोन भागांमध्ये विभागली गेली आहेत. शियांचा मुख्य देश असलेल्या इराणकडे अण्वस्त्रे पुष्कळ अल्प आहेत, तरी तो ही शस्त्रे घेणार नाही. सुन्नी राष्ट्रे म्हणजे सौदी अरेबिया यांच्या नेतृत्वाखाली हा अणूबाँब असल्याने त्यांना विकून पाकला काही लाभ नाही. तेव्हा तुर्कीयेसारखा देश हे अणूबाँब घेऊ शकेल; कारण त्यांना मुसलमान राष्ट्रांमध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण करायचे आहे. सध्या त्यांचीही आर्थिक स्थिती वाईट आहे. तेथे भूकंप झालेला आहे आणि निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे तेही अणूबाँब घेण्याची शक्यता अल्प आहे.

२. पाकिस्तान ‘डर्टी अणूबाँब’ विकण्याची शक्यता

आतंकवादी गटांना अणूबाँब विकले जाऊ शकतील का ?  त्यांच्यावर सर्व जगाचे लक्ष असते. त्यामुळे तशी शक्यता नाही. अणूबाँब नुसते घेऊन जाता येत नाहीत. त्याचा वापर करण्यासाठी शास्त्रज्ञ लागतो. तसेच तो घेऊन जाण्यासाठी कॅरिअर्स, म्हणजे क्षेपणास्त्र लागतात आणि ते करणे फार कठीण आहे. त्याऐवजी ‘डर्टी अणूबाँब’ हा प्रकार विकला जाऊ शकतो. ‘डर्टी अणूबाँब’, म्हणजे अणू कचरा असतो, जो अणुभट्टीतून बाहेर निघतो. डर्टी अणूबाँबला  स्फोटक पदार्थ लावून वापरला, तर सगळीकडे ‘रेडिओ अ‍ॅक्टिव मटेरिअल’ पसरू शकतात. हा धोका असला, तरी तो अणूबाँबसारखा फुटत नाही. असे बाँब यापूर्वी विकले गेले आहेत.

 ३. अणूबाँब विकण्यापासून पाकला परावृत्त करायला हवे !

अणूबाँब बनवण्यासाठी लागणारे प्लुटोनियम अणुभट्टीत निर्माण होते. ते वाट भरटकलेल्या राष्ट्रांना (उदा. उत्तर कोरिया) निश्‍चित विकले जाऊ शकते. या सर्वांवर जागतिक ‘अण्वस्त्र समिती’चे लक्ष आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी करणे सोपे नाही. असे असले, तरी पाकिस्तानला अशक्य असे काहीच नाही. आर्थिकदृष्ट्या वाईट स्थिती असलेला देश स्वत:ला सावरण्यासाठी काहीही करू शकतो. त्यामुळे सर्व जगाने पाकिस्तानला चेतावणी द्यावी, ‘अशा प्रकारचा विचार करू नका. असे केले, तर आम्ही पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करू. त्यामुळे कुठल्याही राष्ट्राशी व्यापार करता येणार नाही.’ पाकिस्तानच्या हालचालींवर अमेरिकेसह सर्व जगाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तो चुकीचे पाऊल उचलत असल्याचे दिसल्यास त्याला वेळीच थांबवणे आवश्यक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.