देहली महानगरपालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये हाणामारी !

  • रात्रभर चालू होता गदारोळ !

  • सकाळी पुन्हा गदारोळ चालू झाल्याने कामकाज स्थगित !

नवी देहली – देहली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीला २२ फेब्रुवारीच्या सायंकाळी प्रारंभ झाल्यानंतर सभागृहात गोंधळ चालू झाला. हा गोंधळ रात्री उशिरापर्यंत चालू होता. भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्या पुरुष आणि महिला नगरसेवक यांच्यात हाणामारी झाली. लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. तसेच या वेळी खुर्च्या, सफरचंद, माईक, बाटल्या आदी वस्तू एकमेकांवर फेकून मारण्यात आल्या. निवडणुकीसाठीची मतपेटी फेकून देण्यात आली. या गोंधळानंतर दोन्ही पक्षांचे नगरसेवक सभागृहात झोपी गेले. या हाणामारीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यावर गदारोळ झाल्याने दिवसभरात ६ वेळा कामकाज स्थगित करण्यात आले. आम आदमी पक्षाच्या नगरसेविका आणि नवनिर्वाचित महापौर शैली ओबेरॉय म्हणाल्या की, भाजपच्या नगरसेवकांनी माझ्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या गुंडगिरीचे हे टोक आहे.

काय घडले ?

स्थायी समिती निवडणुकीमध्ये काही नगरसेवकांनी सभागृहामध्ये भ्रमणभाष संच  आणले होते. त्यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यावरून गदारोळ चालू  झाला. महापौर शैली ओबेरॉय अध्यक्षस्थानी असतांना भाजपचे नगरसेवक तेथे पोचले आणि तेथील मतपेटी उलटवली. यानंतर आप आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी चालू झाली. नगरसेविकांनीही एकमेकांना मारहाण केली.

संपादकीय भूमिका 

संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अशा प्रकारच्या घटना कमीअधिक प्रमाणात घडत होत्या आणि आता त्याचे लोण महानगरपालिकांत पोचले असून उद्या हे ग्रामपंचायतींमध्येही होण्याची शक्यता आहे. यातून देशातील लोकशाहीची स्थिती चिंताजनक झाली आहे, हेच स्पष्ट होते !