‘फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.
१. ग्रह
ग्रह म्हणजे ‘ग्रहण करणे’. ग्रह हे नक्षत्रांकडून येणारी सूक्ष्म ऊर्जा ग्रहण करतात, म्हणून त्यांना ‘ग्रह’ म्हटले आहे. ग्रहांमध्ये ‘बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनि’ हे ५ ग्रह मुख्य असून ते पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. रवि हा आत्म्याशी आणि चंद्र हा मनाशी संबंधित ग्रह आहे. ग्रहांची तत्त्वे आणि ग्रह कोणत्या गोष्टींशी संबंधित आहेत, ते पुढील सारणीत दिले आहे.
बुध, शुक्र आणि चंद्र हे ग्रह ‘पृथ्वी’ आणि ‘जल’ या तत्त्वांशी संबंधित असल्याने ते व्यक्तीचे कुटुंब, कलत्र (जोडीदार), स्वभाव, स्थैर्य आणि सौख्य यांसाठी अनुकूल असतात. रवि, मंगळ आणि शनि हे ग्रह ‘अग्नि’ आणि ‘वायू’ या तत्त्वांशी संबंधित असल्याने ते व्यक्तीचे कार्यक्षेत्र, कर्तृत्व, उत्कर्ष आणि प्रतिष्ठा यांसाठी अनुकूल असतात. गुरु ग्रह ‘आकाशतत्त्वा’शी संबंधित असून तो अनुकूल आणि आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरतो.
२. राशी
पृथ्वी ज्या मार्गाने सूर्याभोवती भ्रमण करते, त्या मार्गाला ‘क्रांतीवृत्त’ म्हणतात. क्रांतीवृत्ताचे १२ समान विभाग म्हणजे राशी. प्रत्येक राशीत सव्वादोन नक्षत्रे असतात. राशी स्थिर आहेत; परंतु पृथ्वी स्वतःभोवती भ्रमण करत असल्यामुळे राशीचक्र फिरतांना दिसते. जन्मकुंडलीत प्रथम स्थानात असणार्या राशीला ‘लग्नरास’ आणि चंद्र ज्या राशीत असतो, तिला ‘जन्मरास’ म्हणतात. या दोन राशी व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावर विशेष परिणाम करतात. लग्नरास ही व्यक्तीचा मूळ पिंड (प्रकृती), तर जन्मरास ही व्यक्तीची स्वभाव-वैशिष्ट्ये दर्शवते.
२ अ. जन्मराशीनुसार व्यक्तीमध्ये सामान्यतः आढळणारी वैशिष्ट्ये
ग्रह त्याला पूरक असे गुणधर्म असलेल्या राशीत असतांना बलवान होतो अन् प्रकर्षाने फळ देतो, उदा. अग्नितत्त्वाचा मंगळ ग्रह अग्नितत्त्वाच्या मेष राशीत प्रकर्षाने फळ देतो. याउलट ग्रह त्याला प्रतिकूल असे गुणधर्म असलेल्या राशीत असतांना निर्बल होतो.
३. कुंडलीतील स्थाने
कुंडलीतील स्थाने म्हणजे दिशांचे समान विभाग. कुंडलीत एकूण १२ स्थाने असून त्यांची कुंडलीतील स्थाने पालटत नाहीत; पण स्थानांमधील राशी मात्र पालटतात. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा विचार कोणत्या न् कोणत्या स्थानावरून होतो. कुंडलीतील १२ स्थानांवरून अभ्यासल्या जाणार्या गोष्टींची माहिती पुढील सारणीत दिली आहे.
३ अ. चार पुरुषार्थांशी संबंधित स्थाने आणि स्थानांचे स्वरूप : हिंदु धर्मानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही मानवी जीवनाची उद्दिष्टे आहेत. कुंडलीतील १२ स्थानांवरून या ४ पुरुषार्थांचा विचार केला जातो. म्हणजे ते पुरुषार्थ साध्य करण्यासाठी भाग्याची अनुकूलता किती आहे, याचा विचार केला जातो. पुरुषार्थांशी संबंधित कुंडलीतील स्थाने आणि स्थानांचे स्वरूप पुढील सारणीत दिले आहे.
स्थानांचे भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूप हे पुरुषार्थ साध्य करण्यातील टप्पे दर्शवतात, उदा. मोक्ष स्थानांपैकी ‘चतुर्थ’ स्थान हे कुलाचारांचे पालन करणे, सण-उत्सव साजरे करणे इत्यादी प्राथमिक स्वरूपाची साधना दशर्वते; ‘अष्टम’ स्थान हे जप, तप, अनुष्ठाने इत्यादी सकाम स्वरूपाची साधना दर्शवते; तर ‘द्वादश’ स्थान हे तन-मन-धनाचा त्याग, गुरुसेवा, अध्यात्मप्रसार इत्यादी निष्काम स्वरूपाची साधना दर्शवते.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.१.२०२३)