मुलाच्‍या विवाहाच्‍या कालावधीत साधनेचे प्रयत्न करून गुरुपौर्णिमेसारखा आनंद अनुभवणार्‍या रामनाथी, गोवा येथील श्रीमती संध्‍या बधाले !

मुलाच्‍या विवाहाच्‍या कालावधीत साधनेचे प्रयत्न करून गुरुपौर्णिमेसारखा आनंद अनुभवणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्रीमती संध्‍या बधाले !

‘२८.११.२०२२ या दिवशी माझा लहान मुलगा श्री. अतुल बधाले याचा विवाह झाला. त्‍याच्‍या विवाहाच्‍या निमित्ताने गुरुकृपेने माझ्‍याकडून झालेले साधनेचे प्रयत्न पुढे दिले आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. मुलाच्‍या विवाहाच्‍या काही दिवस आधीपासून ‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न करायचे’, असे ठरवणे, विवाहाची सिद्धता करतांना मुलांनी सांगितलेल्‍या चुका प्रथम स्‍वीकारता न येणे; पण नंतर ध्‍येयाची जाणीव होऊन चुका स्‍वीकारता येणे

श्री. अतुल बधाले

‘अतुलच्‍या लग्‍नाच्‍या १० दिवस आधी ‘हा विवाहसोहळा नसून गुरुपौर्णिमा सोहळा आहे आणि त्‍या निमित्ताने साधनेचे प्रयत्न वाढवून स्‍वभावदोष अन् अहं यांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न करायचे अन् गुरुपौर्णिमेचा आनंद घ्‍यायचा’, असे मी ठरवले. लग्‍नाची सिद्धता करतांना माझ्‍याकडून काही चुका झाल्‍यावर माझी तीनही मुले (कु. सोनाली, श्री. अमोल आणि श्री. अतुल) मला माझ्‍या चुका सांगत होते. तेव्‍हा मला त्‍या चुका लगेच स्‍वीकारता येत नव्‍हत्‍या. त्‍या वेळी माझ्‍या मनाचा संघर्ष व्‍हायचा. मला वाटायचे, ‘मुलांनी मला समजून घ्‍यावे’; पण नंतर मला ध्‍येयाची जाणीव होऊन माझ्‍या मनात ‘देवच त्‍यांच्‍या माध्‍यमातून माझ्‍यातील स्‍वभावदोष आणि अहंचे पैलू दाखवत आहे अन् मला साधनेत साहाय्‍य करत आहे’, असा विचार येत असे. नंतर मी आनंदी राहून ‘लग्‍नाची पुढची सिद्धता कशी करायची ?’, याविषयी त्‍यांना विचारून घेत असे.

२. विवाहाच्‍या आधी कुलदेवीची ओटी भरण्‍याची प्रथा असणे

२ अ. प्रथेनुसार कुलदेवीची ओटी भरायला पुणे येथे जाऊ शकत नसल्‍याने ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची ओटी भरावी’, असे वाटणे : आमच्‍याकडे विवाहाच्‍या आधी कुलदेवीची ओटी भरण्‍याची प्रथा आहे. आम्‍ही त्‍यासाठी पुणे येथे जाऊ शकत नसल्‍याने आमच्‍या सर्वांच्‍या मनात ‘आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची ओटी भरावी’, असा विचार आला. आम्‍ही याविषयी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले. तेव्‍हा त्‍यांंनी विचारले, ‘‘तुम्‍ही माझी ओटी का भरत आहात ?’’ आम्‍ही त्‍यांना सांगितले, ‘‘तुम्‍ही आम्‍हाला आईसारख्‍या आहात. तुमची ओटी भरली की, कुलदेवीची ओटी भरल्‍यासारखे आहे.’’

श्रीमती संध्या बधाले

२ आ. अन्‍य साधिका श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची ओटी भरतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीसम दिसणे : मी ओटी भरू शकत नसल्‍याने साधिका सौै. श्रावणी परब यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची ओटी भरली. त्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची ओटी भरत असतांना माझ्‍या मनात ‘साक्षात् देवीच समोर आहे आणि मी तिच्‍या चरणांवर डोके ठेवले आहे. देवी मला आशीर्वाद देत आहे’, असा विचार आला. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आम्‍हाला देवीसम दिसल्‍या. आम्‍हा सर्वांना पुष्‍कळ आनंद झाला.

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी विवाहाच्‍या सिद्धतेविषयी प्रेमाने विचारल्‍यावर भाव दाटून येणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्‍हाला विचारले, ‘‘लग्‍नाची सिद्धता कशी चालली आहे ?’’ तेव्‍हा ‘आई आपल्‍या मुलाची काळजी घेते, त्‍याच्‍याशी प्रेमाने बोलते’, त्‍याप्रमाणे त्‍यांचे बोलणे जाणवून माझा भाव दाटून आला आणि माझ्‍या डोळ्‍यांत भावाश्रू आले.

४. श्री. रामानंद आणि सौ. श्रावणी परब यांनी विवाहविधी भावपूर्ण करणे अन् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती कृतज्ञता वाटणे

अतुलच्‍या लग्‍नाचे पुण्‍याहवाचन ‘श्री. रामानंद परब (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ३९ वर्षे) आणि त्‍यांची पत्नी सौ. श्रावणी यांनी करावे’, असे ठरले. तेव्‍हा मला सतत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्री. रामानंद परब यांच्‍या प्रती कृतज्ञता वाटत होती. श्री. रामानंद आणि सौ. श्रावणी यांनी भावपूर्णरित्‍या विधी केले.

५. ‘नातेवाइकांना आश्रम पहायला मिळावा’, असे वाटणे

५ अ. नातेवाइकांना आश्रम आवडणे : अतुलच्‍या विवाहासाठी नातेवाईक येणार होते. माझ्‍या मनात ‘नातेवाइकांना आश्रम पहायला मिळावा. ‘त्‍यांना संस्‍थेचे कार्य समजणे’ महत्त्वाचे आहे’, असा विचार सतत होता. नातेवाइकांना आश्रम पुष्‍कळ आवडला.

५ आ. नातेवाइकांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत

. लग्‍नाला आलेले आमचे नातेवाईक म्‍हणाले, ‘‘समाजात लग्‍नविधी होत असतांना घरातील लोकांची पुष्‍कळ धावपळ असते. आश्रमात लग्‍नविधी शांतपणे होतात. तुम्‍ही किती शांत आहात. साधक सर्वकाही करत आहेत.

२. आश्रमात सगळीकडे स्‍वच्‍छता आहे. सर्व साधक शांतपणे आणि मनापासून सेवा करतात.’’

६. सनातनचा रामनाथी आश्रम हेच तीर्थक्षेत्र असल्‍याने अन्‍य ठिकाणी देवदर्शनाला जाण्‍याचा विचार मनात न येणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्‍हाला लग्‍नानंतर देवदर्शनाला जायला सांगितले. तेव्‍हा माझ्‍या मनात विचार आला, ‘रामनाथी आश्रम हेच तीर्थक्षेत्र आहे.’ मी अतुलला म्‍हणाले, ‘‘आश्रमाला ३ प्रदक्षिणा घाल, तुला इथेच सर्व देवांचे दर्शन होईल.’’

७. अनुभूती

अतुलच्‍या विवाहानंतर ‘श्री. अतुल आणि सौ. आनंदी (सून) सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या खोलीत जाऊन त्‍यांना प्रदक्षिणा घालत आहेत’, असे दृश्‍य मला दिसले. मी याविषयी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्‍यावर त्‍यांना पुष्‍कळ आनंद झाला. त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘भाव तेथे देव !’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेमुळेच मला हे अनुभवायला आले आणि गुरुपौर्णिमेचा आनंद घेता आला. त्‍याबद्दल मी परात्‍पर गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– श्रीमती संध्‍या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)


या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक