युक्रेनवरील आक्रमणापूर्वी पुतिन यांनी मला धमकावले होते !

ब्रिटनने तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दावा !

डावीकडून ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

लंडन (ब्रिटन) – ‘बीबीसी’ने प्रसारित केलेल्या नवीन माहितीपटात ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ते पदावर असतांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांना धमकी दिल्याचे म्हटले आहे. ‘२४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण होण्यापूर्वी मी  पुतिन यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली होती. तेव्हा पुतिन धमकी देत मला म्हणाले, ‘‘बोरिस, मला तुझी हानी करायची नाही; पण क्षेपणास्त्र डागून असे करण्यासाठी केवळ एक मिनिट लागेल’’, असा दावा जॉन्सन यांनी केला आहे. बोरिस जॉन्सन २०१९ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. पदावर असतांना त्यांना ही धमकी मिळाली होती.

बोरिस जॉन्सन यांनी पुढे सांगितले की, युक्रेनवरील आक्रमणापूर्वी मी पुतिन यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. ‘युक्रेन ‘नाटो’मध्ये (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’मध्ये) समाविष्ट होण्याची शक्यता नाही. तुम्हाला हे ठाऊक आहे’, असे पुतिन यांना सांगितले होते. मी पुतिन यांना समजावण्यासमवेतच त्यांना म्हणालो होतो की, युक्रेनवर आक्रमण केल्याने तुमचा थेट सामना नाटोशी होईल. तुम्ही स्वतःला नाटोपासून दूर ठेवू शकणार नाही. पुतिन माझे बोलणे गांभीर्याने घेत नव्हते.