‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

‘हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती’ही स्‍थापन करणार असल्‍याची घोषणा !

रायरेश्‍वर येथे हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ घेतांना डावीकडून श्री. श्रीकांत रांजणकर, कर्नल सुरेश पाटील, हिंदुभूषण श्‍यामजी महाराज राठोड, श्री. सुरेश चव्‍हाणके, श्री. अभय वर्तक आणि अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ

भोर (जिल्‍हा पुणे), २४ जानेवारी (वार्ता.) – ‘सुदर्शन न्‍यूज’ या राष्‍ट्रीय वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍याची शपथ घेतली, त्‍याच पवित्र रायरेश्‍वर येथे हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ घेतली. भारत देशाला इस्‍लामीस्‍तान होण्‍यापासून रोखण्‍यासाठी, तसेच हिंदु धर्मावर होणारे विविध आघात यांपासून धर्माचे रक्षण व्‍हावे आणि पुन्‍हा एकदा हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यास कटीबद्ध होण्‍यासाठी भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वर येथे या शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी ‘राष्‍ट्र निर्माण’ या उपक्रमांतर्गत रायरेश्‍वर येथील ग्रामस्‍थ, विद्यार्थी यांच्‍या दैनंदिन जीवनामध्‍ये भेडसावणार्‍या सामाजिक, शैक्षणिक आणि अन्‍य समस्‍या सोडवण्‍यासाठी योगदान देण्‍याची घोषणा या वेळी केली. श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी ‘हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती’ स्‍थापन करणार असल्‍याचे या वेळी सांगितले.

शपथ ग्रहण कार्यक्रमाचा प्रारंभ स्‍वयंभू रायरेश्‍वर मंदिरात अभिषेक करून झाला आणि पूजा करून हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ घेण्‍यात आली. ‘रायरेश्‍वर ग्रामस्‍थ संस्‍थे’चे सचिव श्री. रवींद्र जंगम यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. त्‍यानंतर रायरेश्‍वर येथील ग्रामस्‍थांना अनेक समस्‍या असूनही साधारण ३७५ वर्षांपासून श्री रायरेश्‍वर येथे धर्माची सेवा ग्रामस्‍थ अविरतपणे कसे करत आहेत, याविषयी सर्वांना अवगत केले. या वेळी सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचेही मार्गदर्शन झाले. श्री. अभय वर्तक म्‍हणाले, ‘‘फक्‍त बोलत नाही, तर धर्मासाठी प्रत्‍यक्ष कृती करणारे आपण सर्व जण आहोत. हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात आपण सर्व जण समवेत आहोत. आपण असेच संघटितपणे कार्य करत राहूया.’’

या वेळी ‘राष्‍ट्र निर्माण संघटन’मधील सहकारी हिंदुभूषण श्‍यामजी महाराज राठोड, संजयभाई परदेशी, कर्नल सुरेश पाटील, नीलकंठ तिवारी, ‘वीर योद्धा संघटने’चे राष्‍ट्रीय प्रमुख श्री. श्रीकांत रांजणकर, ‘स्‍वयंभू रायरेश्‍वर प्रतिष्‍ठान’चे अध्‍यक्ष श्री. शंकर जंगम, उपाध्‍यक्ष श्री. अनिल जंगम, सनातन संस्‍थेचे प्रा. विठ्ठल जाधव, हिंदु जनजागृती समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे, श्री. अशोक बारीक, अन्‍य धर्माभिमानी आणि रायरेश्‍वर येथील ग्रामस्‍थ उपस्‍थित होते. ‘रायरेश्‍वर ग्रामस्‍थ संस्‍थे’चे अध्‍यक्ष श्री. दत्तात्रय जंगम यांनी सर्वांचे आभार व्‍यक्‍त केले.