पाकच्या कराची विमानतळावर गुंडांचे नियंत्रण !  

दाऊद टोळीच्या गुंडाच्या पत्नीने दिली माहिती !

कराची विमानतळ

नवी देहली – पाकच्या कराची विमानतळावर गुन्हेगारी टोळ्यांचे नियंत्रण आहे. ते स्वतःच्या गुंडांच्या कागदपत्रांवर ‘इमिग्रेशनचा’ शिक्का लागू देत नाहीत. त्यामुळे ‘पाकिस्तानमध्ये कोण आले किंवा कोण बाहेर गेले’, याची माहिती उघड होऊ शकत नाही. याद्वारे या टोळ्या अन्य देशांतील गुंडांना किंवा कुणालाही पाकमध्ये बोलावतात. अशी व्यक्ती पाकमध्ये आली, याची कुठेही नोंद रहात नाही.

गुन्हेगारी टोळ्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सलीम फ्रूट याच्या पत्नीने ही माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला दिली आहे.

सलीम फ्रूटच्या पत्नीने चौकशीत म्हटले आहे, ‘मी अनेक वेळा पाकिस्तानात गेली आहे. तिथे दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकील याचे लोक विमानतळावर स्वागत करण्यासाठी येतात आणि माझ्या पारपत्रावर शिक्का न मारता मला विमानतळाबाहेर आणतात. वर्ष २०१३-१४ मध्ये मी ३ वेळा पाकिस्तानला गेली होती. वर्ष २०१३ मध्ये मी माझ्या मुलांसह पाकिस्तानातील कराची येथे गेली होती. तेथे आम्ही छोटा शकिलच्या मुलीच्या लग्नासाठी गेलो होतो. त्या वेळी सलीम फ्रुट आमच्यासमवेत गेला नाही. त्यानंतर मी २४ मार्च २०१४ या दिवशी पाकिस्तानला गेली होती. या वेळीही मी माझ्या मुलांसह कराची येथे गेली होती. या वेळी मी छोटा शकीलच्या दुसर्‍या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्या वेळेही सलीम आमच्यासमवेत पाकिस्तानात गेला नव्हता.’

संपादकीय भूमिका

‘संपूर्ण पाक गुंड आणि जिहादी आतंकवादी चालवत आहेत’, असेच लक्षात येते !