६ वर्षांत वाघ आणि बिबटे यांच्या आक्रमणांत ३३५ जणांचा मृत्यू !

महाराष्ट्राच्या वन खात्याने मागितला अन्य राज्यांचा सल्ला !

मुंबई – महाराष्ट्रात मागील ६ वर्षांत वाघ आणि बिबटे यांच्या आक्रमणांमध्ये ३३५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे मानव आणि वन्य जीव यांंचा संघर्ष अल्प करण्यासाठी महाराष्ट्राने देशातील इतर राज्यांतील वन खात्यांकडे सल्ला मागितला आहे.

राज्यात सध्या ६ राष्ट्र्रीय उद्याने, ५० अभयारण्ये, २३ वर्धन राखीव, अशी ७९ संरक्षित क्षेत्रे आहेत. वन क्षेत्रात वाढ झाली; पण मानवी लोकसंख्येच्या वाढीपाठोपाठ वनांवरील अवलंबनात वाढ झाली. त्यामुळे चंद्रपूर जिह्यात वाघांसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिह्यांत हत्तींसमवेतच्या संघर्षात वाढ झाल्याचे राज्याच्या वन विभागाला आढळून आले आहे.

संपादकीय भूमिका

वन्य प्राण्यांना वाचवले पाहिजे, हे योग्य आहे; मात्र त्यांच्या आक्रमणांपासून जनतेचेही रक्षण झाले पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी जनतेने वनांवर  अतिक्रमण करू नये, तर प्राणी रहिवासी भागात येणार नाहीत, याची निश्‍चिती वन विभागाने करणे आवश्यक !