तुर्भे (वाशी) येथील परिसरात अनधिकृत होर्डिंग्ज !

नवी मुंबई, १४ जानेवारी (वार्ता.) – वाशी आणि तुर्भे विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत होर्डिंग्ज लावले आहे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. कोणत्याही राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहेत. (आदेश दिलेले असतांनाही आचारसंहितेचे उल्लंघन केले जाणे म्हणजे आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार ! – संपादक)

१. ठिकठिकाणी लावलेल्या अनधिकृत होर्डिंग्जमुळे परिसराला बकालपणा आला आहे. अनुमती न घेता ते लावल्याने महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

२. राजकीय दबावामुळे होर्डिंग्जवर कारवाई केली जात नाही.

३. अनधिकृत होर्डिंग्जमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानालाही बाधा निर्माण होत आहे.

४. काही ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही होर्डिंग्ज लावल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे; पण याकडे वाहतूक पोलीसही कानाडोळा करतात.

५. आचारसंहितेचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींच्या विरोधात गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग अधिकार्‍यांना आहेत; मात्र तेही याकडे दुर्लक्ष करत आहेत.

६. वाशी परिसरात अनधिकृत होर्डिंग्ज असल्यास ते त्वरित काढून टाकावेत, असे आदेश कर्मचार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती वाशी विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रेय घनवट यांनी दिली.

संपादकीय भूमिका

आचारसंहितेचे उल्लंघन करत अनधिकृत होर्डिंग्ज लावल्याच्या प्रकरणातील दुर्लक्ष करणार्‍या संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

link: सनातन प्रभात

अनधिकृत होर्डिंगमुळे तुर्भे परिसराला बकाल स्वरूप https://sanatanprabhat.org/marathi/632895.html