१. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रदेशावर अफगाणिस्तानचा दावा !
‘पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध चालू होणार का ? आणि पाकिस्तानच्या बाहेरून ‘अफगाणिस्तान तालिबान’ आणि पाकिस्तान सीमेच्या आत ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ हे एकत्र येऊन पाकिस्तानला पोखरून काढतील का ? तसेच खैबर पख्तुनख्वा, वझेरिस्तान किंवा ज्याला ‘नॉर्थ वेस्ट फ्रंटीयर प्रॉव्हिन्स’ (वायव्य सरहद्द प्रांत) म्हटले जाते, हा प्रदेश पाकिस्तानपासून वेगळा होऊन अफगाणिस्तानमध्ये जाईल का ?’, अशा प्रकारचे अनेक प्रश्न समोर येत आहेत. जेव्हा २ वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य आले, तेव्हा सर्वांत प्रथम तालिबानने ‘ड्युरंट रेषा’ (अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात असलेली सीमा) त्यांना मान्य नसल्याचे म्हटले होते. त्यांना वाटते की, अफगाणिस्तानचा अजून एक भाग पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या प्रदेशातून इम्रान खान निवडून आले आहेत. या भागात पठाण, पख्तुन किंवा पश्तुन लोक रहातात. त्यामुळे अफगाणिस्तानला वाटते की, हा भागही अफगाणिस्तानमध्ये समाविष्ट व्हावा आणि हेच लोक आज तालिबान बनून तेथे राज्य करत आहेत. अशा प्रकारेे ‘सर्व पठाण एकाच देशाखाली यावेत’, अशी त्यांची इच्छा आहे. अर्थातच पाकिस्तानला हे मान्य नाही; कारण हा भाग पाकिस्तानपासून वेगळा झाला, तर पाकिस्तानचे तुकडे होतील. एवढेच नाही, तर ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या गटाचे तळ, प्रशिक्षण शिबिरे आणि प्रशासकीय शिबिरे अफगाणिस्तानमध्ये आहेत. तेथून ते पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आतंकवादी आक्रमणे करतात. पाकिस्तानचे सैन्य आणि पाकची निमलष्करी दले यांच्यावर ते आक्रमणे करतात. अलीकडे या भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला असून पाकची पुष्कळ हानी झाली आहे.
२. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या आक्रमणापुढे पाकिस्तान हतबल !
आधी पाकिस्तानचे अनुमाने ८५ टक्के सैन्य भारत-पाक सीमेवर तैनात होते, तर अफगाणिस्तान-पाक सीमेवर पाकिस्तानी सैन्याची केवळ १ ‘कोर’ (तुकडी) तैनात होती. ‘अफगाणिस्तानचे सैन्य आणि तालिबानचे लोक पख्तुनख्वा हा प्रदेश कह्यात घेतील’, याची पाकिस्तानला भीती आहे. त्यामुळे आता तेथे पाकिस्तानचे मोठे सैन्य तैनात असते. ‘ड्युरंट रेषे’वर पाकिस्तानी सैन्याने कुंपण घालण्यास प्रारंभ केला होता; परंतु अफगाणिस्तानने अनेक वेळा आक्रमणे करून ते कुंपणच तोडून टाकले. पाकिस्तानी सैन्याला ते लावूच दिले नाही. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ हे पाकिस्तानी सैन्यावर नेहमी आक्रमण करते. त्यामुळे पाकिस्तानने त्यांच्यावरील आक्रमणे थांबवण्यास अफगाणिस्तानला सांगितले आहे; पण हे अफगाणिस्तानला मान्य नाही.
३. गृहयुद्ध आणि बिकट अर्थव्यवस्था यांच्यामुळे पाकिस्तानची अवस्था वाईट
मध्यंतरी ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि पाक सैन्य यांच्यात युद्धबंदी झाली होती; पण ती डिसेंबरमध्ये संपली. त्यानंतर पुन्हा ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ची आक्रमणे पाकिस्तानवर चालू झाली आहेत. तसे पाहिले, तर ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ हा एकुलता एक गट नाही. पाकिस्तानपासून वेगळे होऊ इच्छिणारे अनेक गट आहेत. त्यातील दोघांचाच उल्लेख करतो.
बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्य चळवळ चालू आहे. बलुचिस्तानला वेगळे होऊन स्वतंत्र राज्य व्हायचे आहे. आपल्याला आठवत असेल की, वर्ष १९४७ मध्ये बलुचिस्तानने भारतात सहभागी होेण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु सीमा एकत्रित नसल्याने त्यांना ते करता आले नाही. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातही ‘जिओ सिंध’ नावाची स्वातंत्र्य चळवळ चालू आहे. पाकिस्तानमध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणात गृहयुद्ध चालू आहे, तर दुसरीकडे त्यांची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट अवस्थेत आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने सायंकाळी वीजपुरवठा बंद ठेवण्याचे ठरवले आहे. या गृहयुद्धामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मोठ्या चकमकी होत आहेत.
४. अफगाणिस्तानमधील तालिबानच्या सरकारमुळे पाकिस्तानची हानी !
तालिबानची निर्मिती झाली होती, तेव्हा पाकिस्तानला वाटत होते की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्याने आता पाकिस्तानला अफगाणिस्तानमध्ये सामरिक खोली मिळेल. भारताने पाकिस्तानवर आक्रमण केेले, तर पाकिस्तानी सैन्याला अफगाणिस्तानमध्ये जाऊन तेथून भारताशी लढता येईल; कारण पाकिस्तान सीमेपासून पाकिस्तानची रुंदी केवळ १५० ते २०० किलोमीटरच आहे. आता पाकिस्तानला सामरिक खोली मिळण्याऐवजी तालिबानलाच पाकिस्तानमध्ये सामरिक खोली मिळाली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यापासून पाकिस्तानला लाभ न होता प्रचंड प्रमाणात हानीच होत आहे. तालिबानचे राज्य आल्यानंतर आपले बळ पुष्कळ वाढेल, अर्थव्यवस्था सुदृढ होईल आणि आपण जगात महत्त्वाचा देश होऊ, असे पाकिस्तानला वाटले होते; परंतु तसे काही झाले नाही. तेथे केवळ हिंसाचार वाढत असल्याने पाकिस्तानची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे जी धमकी ‘अफगाणिस्तान तालिबान’ने दिली आहे, त्यात बरेच तथ्य आहे. त्यानुसार पाकिस्तान तुटण्याची शक्यता पुष्कळ वाढलेली आहे. पाकिस्तान तुटला, तर खैबर पख्तुनख्वा हा अफगाणिस्तानला जाऊन मिळेल. त्यामुळे पाकिस्तानचे बळ आणि आर्थिक शक्ती अजून अल्प होईल.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
संपादकीय भूमिका
|