पाकिस्तानी मौलवींचा फतवा- (म्हणे) ‘जिहाद करण्याचा अधिकार केवळ इस्लामिक स्टेटला !’

‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या आक्रमणांनंतर पाकिस्तानी मौलवींचा फतवा  !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील प्रसिद्ध मौलवींनी  (मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता) आतंकवादाच्या विरोधात १४ पानांचा फतवा काढत आतंकवादाची निंदा करत ‘जिहाद करण्याचा अधिकार केवळ इस्लामिक स्टेटला आहे’, असे म्हटले आहे. हा फतवा ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेकडून पाकच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये सुरक्षादलांवर आक्रमण अधिक तीव्र करण्यात आल्यानंतर काढण्यात आला आहे.

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दारुल उलूम पेशावर आणि जामिया दारुल उलूम हक्कानिया यांसह अनेक मदरशांशी संबंधित मौलवींनी फतवा काढला आहे. यात म्हटले आहे की, राज्यातील पोलीस आणि सैन्य यांच्या विरोधात कुणीही शस्त्र हातात घेणे, हे शरीयत कायद्याच्या आणि देशाच्या विरोधात आहे. जो कुणी पाकच्या राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या विरोधात बंड करेल, त्याला कायद्यानुसार शिक्षा केली जाईल.

प्रत्येकाला ‘जिहाद’ (पवित्र युद्ध) घोषित करण्याचा अधिकार नाही. हा विशेषाधिकार केवळ इस्लामिक स्टेटच्या प्रमुखाला आहे.

संपादकीय भूमिका

  • गेल्या ३ दशकांहून अधिक काळ पाक भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करत असतांना पाकच्या या मौलवींना हे लक्षात आले नव्हते; मात्र आता हाच जिहादी आतंकवाद पाकलाच गिळंकृत करू लागल्यावर पाकच्या मौलवींना जाग आली आहे आणि त्यांना जिहादचा कथित ‘खरा’ अर्थ समजू लागला आहे, हे लक्षात घ्या !
  • इस्लामिक स्टेटकडून ज्या प्रकारे लोकांच्या हत्या करण्यात आल्या, त्याला पाकिस्तानी मौलवी ‘जिहाद’, म्हणजे ‘पवित्र युद्ध’ म्हणत असतील, तर तो इस्लामचा द्रोह आहे, असे खर्‍या इस्लामवाद्यांनी सांगायला हवे !