‘ह्मुमन कंपोस्टिंग’ची म्हणजे मानवी मृतदेहापासून खत बनवण्याची नवीन संकल्पना अमेरिकेत उदयास आली आहे. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली मृतदेहावर प्रक्रिया करण्याचा हा नवीन प्रकार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत वॉशिंग्टन, न्यूयॉर्कसह ६ राज्यांनी ‘ह्मुमन कंपोस्टिंग’ला मान्यता दिली आहे. अमेरिकेत पारंपरिक अंत्यविधीला पर्याय म्हणून ही पद्धत नावारूपाला येत आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला मृत्यूपूर्वीच तिच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे रूपांतर माती किंवा खत यांमध्ये करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो.
‘पर्यावरण पालटाविषयी जागरूकता वाढल्याने अमेरिकेत अनेक जण नवीन पर्यायांविषयी उत्सुक आहेत. पारंपरिक पद्धतीच्या दफन किंवा दहन विधीसाठी लाकूड अथवा भूमी या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा लागतो. त्या तुलनेत ‘ह्मुमन कंपोस्टिंग’ पर्यावरणपूरक आहे. तसेच त्याचा व्यय विशेष नाही’, असे ही सुविधा उपलब्ध करून देणार्या ‘रिकंपोज’ आस्थापनाच्या संस्थापकाने सांगितले आहे. स्वीडनमध्ये या पद्धतीला कायदेशीर मान्यता आहे. ‘मृतदेहाचे खत कुटुंबियांना देण्यात येईल आणि कुटुंबीय हे खत बागेत, झाडे, फळझाडे यांना वापरू शकतात’, असे ही सुविधा पुरवणार्या आस्थापनाचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे सरकारी पातळीवर या पद्धतीचा विचार करण्यात येणे, हे भयावह आहे. पाश्चात्त्य देशात असे काहीतरी भयावह प्रयोग करण्यात येत असतात, जे चर्चेत रहातात. मानवी जीवनाशी संबंधित या प्रयोगामध्ये पर्यावरणरक्षण, अल्प खर्च, प्रदूषणरहित अशा नावाखाली भाव-भावनांचा विचार केला जात नाही.
पाश्चात्त्य विकृती
व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हिंदु धर्मानुसार तिचा पुढचा प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी धार्मिक विधी करण्यात येतात अन् व्यक्तीला या जन्माची कुठल्याही प्रकारे आठवण शेष राहू नये, यासाठी स्मशानात तिच्या देहावर अग्नीसंस्कार करून तो पंचतत्त्वांमध्ये विलीन केला जातो. अन्य पंथियांमध्ये त्यांच्या दफनभूमीत देह दफन करून प्रार्थना केली जाते. दोन्ही पद्धतींमधील अध्यात्मशास्त्राचा विचार थोडा वेळ बाजूला केल्यास घरापासून दूर विशिष्ट ठिकाणीच त्यांचे अंतिम विधी केले जातात, हे महत्त्वाचे आहे. ‘रिकंपोजिशन’ प्रक्रियेतून ३० दिवसांमध्ये मानवी देहापासून खत सिद्ध करणे, ते पुन्हा घरात आणून बागेत वापरणे म्हणजे पुन्हा व्यक्तीला तिच्या घरीच आणल्यासारखे आणि तिच्या देहाची विटंबना करण्यासारखे नाही का ? मानवी अवशेष असणारे हे खत स्थुलातून आणि सूक्ष्मातून पुढील कुठले भयंकर परिणाम करील ?’, याची कल्पना आता करता येणार नाही. ही एकप्रकारे विकृतीच झाली. पुढे आणखी विकृती वाढून लोक स्मशानात जाणे विसरून जातील आणि घरीच मृतदेह पुरतील अन् त्यापासून खत बनवण्यासाठी प्रयत्न करतील. यातून देवाने दिलेल्या मानवी शरिराचे महाअवमूल्यन होईल.
भयावह दुष्परिणाम
पाश्चात्त्यांमधील संशोधकांनी दहन आणि दफन विधी यांची तुलना केली, तर त्यांना ‘दहनविधी अधिक परिणामकारक अन् व्यक्तीच्या आत्म्याला पुढील गती देणारा आहे’, असे अनुभवले. कंपोस्टिंग प्रक्रियेत शरिराचे दफन नाही, तर थेट विविध घटकांद्वारे विघटन करण्याचाच भाग होतो. त्यामुळे व्यक्तीचा पुढचा प्रवास दूरच; पण व्यक्तीचा आत्मा तिच्या घरीच, तसेच परिसरातच घुटमळत राहून अनिष्ट शक्तींचा त्रास वाढणे, घरातील आणि आजूबाजूचे वातावरण भयावह बनणे, विविध प्रकारचे त्रास वाढणे असे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. या कशाचाच विचार न करता केवळ पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली विकृती वाढवण्याचा भाग होईल. पाश्चात्त्य देशांत पितर पृथ्वीवर येण्याचा दिवस ‘हॅलोवीन’ म्हणून साजरा करतात. या दिवशी पितरांनी आपल्याला ओळखू नये; म्हणून लोक भयावह वेशभूषा करतात. या दिवशी जे पदार्थ, (विशेषत: केक) बनवलेले असतात, ते मानवी अवयवांच्या आकारात, उदा. तुटलेला हात, तुटलेला पाय, मानवी शिर अशा प्रकारे बनवलेले असतात. याविषयी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये हॅलोवीनमध्ये सहभागी व्यक्तींची नकारात्मकता सहभागी झाल्यानंतर अनेक पटींनी वाढलेली, तर थोडी फार सकारात्मक असलेली व्यक्ती नकारात्मक झाल्याचे आढळून आले. केवळ चित्रविचित्र आणि भयावह वेशभूषा, विकृत आकाराचे केक यांचा समावेश असलेल्या एका दिवसाच्या कार्यक्रमामुळे एवढा नकारात्मक परिणाम होतो, तर मृतदेहाचे खत घरी आणल्यावर किती नकारात्मक परिणाम होतील ? हे सांगणेही कठीण आहे.
हिंदु धर्माकडे वळावे !
काही दिवसांपूर्वी ‘टेस्ला’ या जगप्रसिद्ध आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी ‘मानवी मेंदूत एक चिप लावून त्याद्वारे मनुष्याच्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार’, असे सांगितले होते. त्यांचा हा प्रयोग म्हणजे सरळसरळ निसर्गाला आव्हान देण्याचा भाग आहे. ते काही प्रमाणात रुग्णांसाठी ठीक आहे; मात्र त्याचा सार्वत्रिक वापर भयावह होणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी अनेक प्रयत्न करता येण्यासारखे आहेत. कार्बनचे पुष्कळ उत्सर्जन करणार्या उद्योगांवर निर्बंध घालणे, शस्त्रास्त्र स्पर्धांमुळे अनेक महासंहारक आणि विध्वंसक शस्त्रे बनवण्याची चढाओढ लागली असून त्यावर नियंत्रण आणणे, रासायनिक खतांचे उत्पादन आणि वापर बंद करणे, खासगी वाहनांचा उपयोग अल्प करून सार्वजनिक वाहने वापरणे इत्यादी अनेक प्रकारे प्रदूषण नियंत्रणात येऊ शकते. कोरोना महामारीनंतर ‘मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर त्याची विल्हेवाट चांगल्या प्रकारे होते, तसेच त्यातून रोगराईही पसरत नाही’, असे पाश्चात्त्य देशांना आढळले. त्यामुळे मृतदेह जाळण्याचा भाग काहींनी चालू केला. हिंदु धर्म पर्यावरणपूरक असल्याने शेवटी जगाला त्याकडे वळण्याविना गत्यंतर नाही, हेच खरे !
मानवी भाव-भावनांचा विचार न करता पाश्चात्त्य करत असलेले विविध प्रयोग हे भयावह विकृतीलाच निमंत्रण ! |