अमेरिकेत होत आहे मानवी मृतदेहापासून खताची निर्मिती !

वॉशिंग्टन (अमेरिका) – हिंदु, बौद्ध, जैन, शीख धर्मांतील व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार केला जातो, तर मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मामध्ये मृतदेह पुरला जातो. अमेरिकेत मात्र एक आस्थापन मृतदेहांपासून खत बनवण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे; मात्र हे खत पर्यावरणपूरक आहे का ? अशी शंका घेतली जात आहे. वर्ष २०१९ मध्ये पहिल्यांदा वॉशिंग्टन राज्याने या खताला मान्यता दिली आहे.

आतापर्यंत अमेरिकेच्या ६ राज्यांनी ‘ह्युमन कंपोस्टिंग’साठी अनुमती दिली आहे. यामुळे मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला तिच्या पार्थिवाचे रूपांतर मातीमध्ये किंवा खतामध्ये करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो.

‘ह्युमन कंपोस्टिंग’मध्ये नैसर्गिक आणि सुरक्षित प्रक्रिया वापरून मृतदेहाचे रूपांतर मातीमध्ये करता येऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी लाकडाचे तुकडे, अल्फाल्फा (एक प्रकारचे रोप) आणि सुकलेल्या पेंढ्याने भरलेल्या कंटेनरमध्ये मानवी मृतदेह ठेवला जातो. यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ३० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर निर्माण झालेली माती कुटुंबियांकडे सोपवली जाते. ही माती फुलझाडे, फळझाडे आणि भाज्या यांच्यासाठीही खत म्हणून वापरली जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

अध्यात्माचे काडीचेही ज्ञान नसल्याने सुधारणावादाच्या नावाखाली असले विकृत प्रकार पाश्‍चात्त्यांना सुचतात ! मृतदेहावर अग्नीसंस्कार हा सर्वच अंगाने योग्य प्रकार आहे. पाश्‍चात्त्य त्याचा अभ्यास करतील, तो सुदिन !