भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून मोहिमेला प्रारंभ
कणकवली – भाजचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे ‘स्टिकर’ वाहनांना लावण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातही असे ‘स्टिकर’ लावण्याची ही मोहीम चालू ठेवू’, असे आमदार नितेश राणे यांनी या वेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणे यांनी ही मोहीम चालू केली आहे.
Nitesh Rane | कणकवलीत आमदार नितेश राणे करणार स्टिकर आंदोलन#NiteshRane #sindhudurga pic.twitter.com/1FNeKTAb1w
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2023
‘आम्ही पण सिद्ध आहोत ! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय !’ अशी घोषणा ६ जानेवारीला रात्री आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केली होती. त्या अनुषंगाने ७ जानेवारीला आमदार राणे यांनी शहरातील ‘ओम गणेश’ या स्वत:च्या निवासस्थानापासून दुचाकींना ‘स्टिकर’ लावण्याच्या मोहिमेला आरंभ केला. त्यानंतर ‘स्टिकर’ लावलेल्या वाहनांची शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत फेरी काढण्यात आली. आमदार राणे हेसुद्धा या फेरीत सहभागी झाले होते.
आम्ही पण तयार आहोत …
“धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराज की जय !!! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule pic.twitter.com/MwyvPwQVFj
— nitesh rane (@NiteshNRane) January 6, 2023
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय ! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ! जय भवानी जय शिवाजी !, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आसमंत दुमदुमून सोडला. या वेळी आमदार राणे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे भारत देश आणि महाराष्ट्र यांतील प्रत्येक पिढीसाठी ‘धर्मवीर’च आहेत आणि ते ‘धर्मवीर’च रहातील. वर्षानुवर्षे पिढ्यान्पिढ्या छत्रपती संभाजी महाराज यांना जनतेने दिलेली ‘धर्मवीर’ ही पदवी कुणी कितीही प्रयत्न केले, तरी पुसली जाणार नाही. आम्ही महाराजांची ‘धर्मवीर’ ही पदवी अभिमानाने कायम सांगत राहू. त्यासाठी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे ‘स्टिकर’ गाड्यांवर लावले जात आहेत.