सध्याचा काळ धोकादायक आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) – युरोपीय लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जीवनाच्या कठीण भागाकडे नेहमीच दुसर्‍याकडून लक्ष ठेवले जाणार नाही. जर जगात एकच शक्तीचे वर्चस्व निर्माण झाले, तर कोणतेही क्षेत्र स्थिर होणार नाही, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘सध्याचा काळ धोकादायक आहे. या संक्रमण काळामध्ये नवीन जागतिक व्यवस्था बनवण्यासाठी वेळ लागेल; कारण पालट मोठा आहे’, असेही ते म्हणाले.

जयशंकर पुढे म्हणाले की,

१. युरोप केवळ त्याच्याच भागाचा विकास करू इच्छित आहे. तो शक्य तेवढे आंतरराष्ट्रीय समस्यांपासून दूर राहू इच्छितो, तसेच तो संरक्षणाच्या कठीण प्रकरणांविषयीही दूर रहातो. युरोपने व्यापारावर लक्ष केंद्रीत केले. बहुपक्षवादावर जोर दिला. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ (जागतिक तापमानवृद्धी) आणि मानवाधिकार यांसारख्या सूत्रांवर स्वतःच्या अटींनुसार जगाला आकार देण्यासाठी आर्थिक बळाचा वापर केला.

२. एकमेकांमध्ये अनेक वाद असतांनाही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम यांनी मान्य केले की, अमेरिका आता पूर्वीप्रमाणे जागतिक स्तरावर भूमिका वठवू शकत नाही. त्यामुळे तिला माघार घेतली पाहिजे. अमेरिकेला हे लक्षात आले आहे की, स्वतःची पूर्वी प्रमाणे क्षमता निर्माण  करायला हवी; म्हणूनच त्यासाठी ती आमच्यासारख्या देशांना साहाय्य करू लागली आहे.