शहरे सोडा आणि गावाकडे चला ! – जपान सरकारचे जनतेला आवाहन

  • लोकसंख्यावाढीच्या पार्श्‍वभूमीवर आवाहन !

  • स्थलांतरासाठी नागरिकांना आर्थिक साहाय्य !

टोकियो – जपानममधील लोकसंख्येचा वाढता आलेख पहाता शहरांवरील ताण न्यून करण्यासाठी जपान सरकारने नागरिकांना ‘शहरे सोडा आणि गावाकडे चला’, असे आवाहन केले आहे. शहरे सोडण्यासाठी प्रत्येकास साडेसहा लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात येत आहे. या आर्थिक साहाय्यामुळे त्यांना ग्रामीण भागात स्थायिक होणे सोपे जाईल, असा विश्‍वास सरकारने व्यक्त केला आहे.

जे लोक टोकियो सोडून ग्रामीण भागात जाण्यास सिद्ध आहेत, त्यांना आर्थिक साहाय्यासह इतरही सर्व साहाय्य सरकारकडून करण्यात येणार आहे. वर्ष २०२७ पर्यंत अनुमाने १० सहस्र नागरिक ग्रामीण भागात जाऊन वसतील, अशी सरकारला आशा आहे. टोकियोची लोकसंख्या ३ कोटी ८० लाख इतकी आहे. दुसरीकडे अनेक गावे ओस पडली आहेत. शहर सोडून जाणार्‍यांना जपान सरकारकडून रोजगारही उपलब्ध करून देण्यात येत आहे; परंतु वर्ष २०२१ मध्ये केवळ २ सहस्र ४०० नागरिकांनीच या योजनेचा लाभ घेतला.