भारतात सध्या घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे किंवा घटस्फोट झाले नाहीत, तरी विवाहानंतर पती-पत्नींचे एकमेकांशी पटण्याचे प्रमाण न्यून होत आहे. याची अनेक कारणे आहेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘संस्कार’ ! यामध्ये चांगला संसार करणे असो किंवा जीवनामध्ये खर्या अर्थाने यशस्वी होणे असो, दोन्हींसाठी व्यक्तीवर नैतिक मूल्यांच्या दृष्टीने आवश्यक असणारे आणि धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले १६ संस्कार आवश्यक आहेत. यांमुळे जन्मापासून देह आणि चित्त यांची शुद्धी होते. इंद्रियनिग्रह होऊन सदाचरणाची सवय लागते. ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होते.
मुलांवर लहानपणापासूनच नैतिक मूल्यांच्या दृष्टीने उपयुक्त संस्कार केल्यास त्यांना योग्य-अयोग्य समजते. त्यामुळे जीवनात येणार्या कठीण प्रसंगामध्ये आपण कसे वागायला हवे किंवा कशाला प्राधान्य द्यायला हवे, हे आपोआपच समजते. समजा स्वतःला समजले नाही, तर इतरांचे साहाय्य घेतले जाते; परंतु नैतिक संस्कार नसतील, तर अहंभावामुळे ‘मला महत्त्व मिळायला हवे’, ‘माझेच योग्य आहे’, ‘मी सांगते ते ऐकायला हवे’, हे विचार प्रबळ होतात आणि संसाराची गाडी रूळावरून घसरायला प्रारंभ होतो. पती-पत्नी दोघांच्याही मनामध्ये असे विचार आल्यास संसाराची गाडी घसरायला वेळ लागत नाही. याऐवजी प्रसंगानुरूप तडजोड कुणी आणि कधी करायची, हे समजल्यास संसाराची गाडी व्यवस्थित चालते. याच समवेत आध्यात्मिक संस्कारांचेही महत्त्व तेवढेच आहे.
खरेतर वैदिक संस्कारांनी जीवन समृद्ध होत असते आणि त्यातून मानवाला आनंद अन् जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. असे असतांना विवाहामधील आध्यात्मिक संस्काराची जागा पाश्चात्त्यांच्या विकृतीचे अंधानुकरण करून धार्मिक विधी न करता मनोरंजन, मौजमजा, दिखावा, मानपान यांनी घेतली आहे. याचा परिणाम विवाहाच्या वेळी धार्मिक संस्कार न झाल्यामुळे त्याचा परिणाम संबंधित व्यक्तींच्या जीवनावर होतांना दिसतो.
हिंदु विवाह संस्कार हा सर्वांच्याच हिताचा असून विवाहात अनेक प्रकारचे विधी, उदाहरणार्थ सीमांतपूजन, मधुपर्कपूजन, गौरीहरपूजन आदी प्रत्येक विधीचे वेगवेगळे मंत्र आहेत. विवाहाच्या मंत्रांचा अर्थ नीट समजून घेतला, तर ‘या प्रकारानेच विवाह व्हावा’, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटेल. सर्व संस्कार यथाविधी केल्याने देवतांची कृपा होते.
– श्री. जयेश बोरसे, पुणे