२९.६.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील एका सन्मान सोहळ्यात ‘पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदावर आरूढ झाले’, असे घोषित करण्यात आले. सद्गुरु नीलेश सिंगबाळ वाराणसी आश्रमात वास्तव्याला असतात. या आश्रमात राहून साधना करणार्या साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्री. राजाराम पाध्ये (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६५ वर्षे)
१ अ. ‘प्रत्येक साधक घडावा आणि त्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु नीलेशदादांना तीव्र तळमळ असल्याने त्यांनी आश्रमात सत्संग चालू करणे : ‘प्रत्येक साधक घडावा, तसेच आश्रम चांगला व्हावा, याची सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना तीव्र तळमळ आहे. सर्व साधकांना साधनेची योग्य दिशा मिळावी आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने व्हावी, यासाठी सद्गुरु दादांनी आश्रमात आठवड्यातून एकदा सत्संग चालू केला. या सत्संगात त्यांनी साधकांना व्यष्टी साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणे, आश्रमातील चैतन्य वाढावे, यासाठी प्रयत्न वाढवणे आणि साधकांच्या साधनेची घडी बसवणे, हे प्रयत्न केले.
‘साधकांना आश्रम आपला वाटावा आणि आश्रमात रहायला मिळाल्याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञताभाव निर्माण व्हावा’, यासाठी सद्गुरु दादा साधकांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
१ आ. साधनेतील चुका सुधारण्यासाठी साधकाला साहाय्य करणे : माझ्यातील काही तीव्र स्वभावदोषांमुळे माझ्याकडून साधना करतांना होत असलेल्या चुका मी एकदा सद्गुरु दादांना सांगितल्या. त्यावर त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यानुसार मी प्रयत्न केल्यावर माझे चुकांचे प्रमाण न्यून होऊन माझ्या साधनेची घडी बसायला साहाय्य झाले.
१ इ. प्रेमभावामुळे सर्वांशी आपुलकीने बोलणे : सद्गुरु नीलेशदादा सेवाकेंद्रात येणार्या लहान व्यक्तीपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी आपुलकीने बोलतात. ते समोरील व्यक्ती सांगत असलेल्या विषयाशी समरस होऊन बोलत असल्यामुळे समोरच्याला परकेपणा वाटत नाही.
१ ई. साधकांकडे स्वतः जातीने लक्ष देऊन त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे : वाराणसी येथे उन्हाळ्यामध्ये तीव्र उन्हाळा, तर थंडीच्या वेळी पुष्कळ थंडी असते. याचा साधकांना त्रास होऊ नये, यासाठी ते स्वतः लक्ष देऊन आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतात.
सद्गुरु नीलेशदादांच्या सहवासात रहायला मिळाले. याबद्दल परापर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘सद्गुरु नीलेशदादांचे मार्गदर्शन आणि त्यांचे चैतन्य यांचा आम्हा सर्व साधकांना लाभ करून घेता येऊ दे’, अशी गुरुदेवांच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करतो.’
२. श्री. शशांक सिंह
२ अ. ‘साधकाचे मणके दुखत आहेत’, हे कळल्यावर सद्गुरु नीलेशदादांनी मणक्यांना स्पर्श करणे आणि दुखणे उणावून ‘तेथे सुरक्षाकवच निर्माण झाले’, असे जाणवणे : ‘मी वाराणसी आश्रमात नवीनच आलो होतो. मला पूर्वी शारीरिक सेवा करण्याची सवय नसल्याने सेवा केल्यावर माझी कंबर दुखत असे. एकदा सद्गुरु नीलेशदादांनी युवा साधकांना खोलीत बोलावून विचारले, ‘‘तुम्हाला काही शारीरिक त्रास होत नाहीत ना ?’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘माझे मणके दुखत आहेत.’’ तेव्हा त्यांनी दुखणार्या जागेवर स्पर्श करून मला तपासले. त्यानंतर माझा तो त्रासच बंद झाला. त्या वेळी ‘दुखणार्या जागेवर सुरक्षाकवच निर्माण झाले’, असे मला जाणवले.
२ आ. ‘साधकाचे पाय म्हणजे राम आणि कृष्ण यांचे पाय आहेत’, असा भाव असलेले सद्गुरु नीलेशदादा ! : एकदा आम्ही काही साधक आश्रमातील गच्चीत असलेल्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता करत होतो. त्या वेळी टाकीवर चढणे पुष्कळ कठीण होते. टाकीची स्वच्छता झाल्यावर आम्ही टाकीच्या बाहेर येत होतो. तेव्हा मी सद्गुरु नीलेशदादांना म्हटले, ‘‘आता टाकी स्वच्छ झाली आहे; पण आमचे पाय अजून टाकीतच असल्याने आम्ही टाकीबाहेर येऊन पुन्हा एकदा पाणी टाकून ती स्वच्छ करतो.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुमचे पाय म्हणजे राम आणि कृष्ण यांचे पाय आहेत !’’ त्यांनी असे म्हणताच माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. ‘संत आम्हाला किती सांभाळतात ? त्यांचा साधकांप्रती कसा भाव असतो ?’, हे माझ्या लक्षात आले.
२ इ. सेवेची तळमळ : मी सद्गुरु नीलेशदादा यांच्या समवेत एक मास धर्मप्रसाराच्या सेवेनिमित्त विविध ठिकाणी गेलो होतो. तेव्हा पूर्ण दिवस प्रवास केल्यामुळे सद्गुरु दादांना थकवा येत असे, तरीही ते रात्रीपर्यंत सेवा करायचे. सत्संग ऐकतांना त्यांना कंबरदुखीचा त्रास व्हायचा; पण ते झोपून ऐकण्याचा प्रयत्न करायचे.
२ ई. सद्गुरु नीलेशदादांमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणे : सद्गुरु दादा आश्रमात अथवा साधकांच्या बाजूला बसून संगणकावर साधनेविषयीची सूत्रे पहात असत. तेव्हा मला त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होते.’
३. सुश्री (कु.) सुनिता छत्तर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४३ वर्षे)
३ अ. आदर्श वागणे : ‘सद्गुरु नीलेशदादांचे वागणे आदर्श आहे. त्यांचे बोलणे नम्र आणि मृदू असते. कोणत्याही प्रसंगात ते शांत, स्थिर आणि संयमी असतात. ते कोणतेही सूत्र सांगण्याची घाई करत नाहीत.
३ आ. सद्गुरु नीलेशदादांची दिनचर्या आणि सेवा नेहमी नियोजनबद्ध असते.
३ इ. सद्गुरु नीलेशदादांनी सजीव आणि निर्जीव अशा सर्व घटकांचा विचार करणे अन् ‘शेरू’ नावाच्या कुत्र्याचीही प्रेमाने काळजी घेणे : साधकांचा विचार करण्याबरोबरच सद्गुरु दादा आश्रम, विविध सेवा, आश्रमातील वस्तू, प्राणी आणि झाडे यांचाही विचार करतात. पूर्वी आश्रमात ‘शेरू’ नावाचा एक कुत्रा होता. सद्गुरु नीलेशदादा एखाद्या साधकाप्रमाणेच त्याची काळजी घ्यायचे. ‘शेरू’ जोरात भुंकत असतांना ते त्याच्याशी प्रेमाने बोलायचे. तेव्हा तो त्यांचे बोलणे शरणागतभावाने ऐकायचा.
सद्गुरु दादांनी आमच्यापुढे प्रभु श्रीरामाचा आदर्श ठेवला आहे आणि त्याप्रमाणे ते आम्हाला घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक जुलै २०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |