वारसास्थळाच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष
पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथे पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर होते. वर्ष १५०६ मध्ये पोर्तुगिजांनी हे मंदिर पाडले. सध्या त्याठिकाणी मंदिराचे प्रवेशद्वार अस्तित्वात असून याला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळ गावाचे प्रवेशद्वार) असे नाव देण्यात आले आहे. गोवा सरकारने वर्ष १९८३ मध्ये हे वारसास्थळ म्हणून घोषित केले. वारसा स्थळी कोणतेही खोदकाम किंवा बांधकाम करण्यास मनाई आहे. वारसास्थळाची देखभाल करण्याचे उत्तरदायित्व गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याचे आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अनधिकृतपणे भूमी खणून खांब उभारून त्यावर मंडप उभारण्यात येत आहे; मात्र याकडे पुरातत्व खाते पूर्णपर्ण दुर्लक्ष करत आहे. यामुळे श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तगणांमध्ये तीव्र असंतोष आहे.
चर्चसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याच्या संगनमताने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला आहे. मंदिराच्या ठिकाणी असलेले पवित्र वडाचे झाड नष्ट करणे, मंदिराचे दगड अवजड यंत्रणांच्या साहाय्याने नष्ट करणे, ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या नावात अनधिकृतपणे ‘चर्च’ हा शब्द घुसडणे, वारसास्थळी अनधिकृतपणे फेस्ताचे आयोजन करणे, तेथे अनधिकृतपणे क्रॉस उभारणे, हिंदूंना वारसास्थळी जाण्यास मज्जाव करणे आदी माध्यमांतून चर्चसंस्था पुरातत्व खात्याच्या संगनमताने भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे.
पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तगणांनी सुमारे एक मासापूर्वी पुरातन मंदिर नष्ट करण्यासाठी चर्चसंस्थेला पाठिंबा देणार्या पुरातत्व खात्याच्या तत्कालीन अधिकारी ब्लॉसम मडेरा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अद्याप या संदर्भात कारवाई झालेली नाही.