पाकिस्तानातील सिंधमध्ये हिंदु मुलाला ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक

कराची – पाकिस्तानातील सिंधमध्ये लवकुमार मेघवाड या हिंदु मुलाने ‘फेसबुक पोस्ट’वर कथित ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. त्या मुलाची एवढीच चूक होती की, त्याने ‘पोस्ट’मध्ये ‘भगवान’ऐवजी ‘मौला’ हा शब्द वापरला. सिंधी भाषेत ‘मौला’ हा शब्द सामान्यतः देवाला संबोधण्यासाठी वापरला जातो, या मुलावर पाकिस्तानी कायद्यान्वये ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१. ‘जय सिंध फ्रीडम मुव्हमेंट’चे संस्थापक जफर सहितो यांनी ‘ट्विटर’वर या प्रकरणाची माहिती देतांना लिहिले की, लवकुमार यांनी त्यांच्या ‘फेसबुक पोस्ट’मध्ये देवाकडे तक्रार केली होती की, जेव्हा हिंदु मुलींना त्यांच्या घरातून प्रतिदिन पळवून नेले जाते, तेव्हा मुलीच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढवत असेल ? त्या कुटुंबाला पुष्कळ त्रास होतो. जेव्हा मुली पळवल्या जातात, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा आक्रोश मौला (देव) का ऐकत नाही ?

२. त्यांनी पुढच्या ‘ट्वीट’मध्ये लिहिले की, लवकुमारच्या पोस्टमध्ये निंदनीय काहीही नाही; पण त्यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले आहे.

३. कराचीतील एका महिला पत्रकाराने ‘ट्विटर’वर लिहिले की, सिंधमधील हिंदू आणि मुसलमान दोघेही देवाला मौला, भगवान, धरी किंवा ईश्वर असे संबोधतात. यासह सिंधी साहित्यात देवासाठी ‘मौला’ हा शब्दही वापरला जातो. या पत्रकाराने पाकिस्तान सरकारला नागरिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.

४. अशाच एका घटनेत प्राध्यापक नूतन कुमार हे ईशनिंदेच्या आरोपाखाली अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या कारागृहात आहेत.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी ईशनिंदेच्या कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. तेथील हिंदूंवर अत्याचार चालूच राहिले, तर येणार्‍या काही वर्षांत ते नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भारत सरकार हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार ?