श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी मुख्य सचिवांना लक्ष घालण्यास सांगणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही चौकशी बंद करणे, हा न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान आहे. त्यामुळे ही चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर ‘सी.आय.डी.’च्या अहवालानुसार गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘तुळजापूर मंदिर प्रकरणी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना लक्ष घालण्यास सांगतो’, असे आश्वासन श्री. घनवट यांना दिले. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी अमरावती येथील विधान परिषदेतील भाजपचे आमदार तथा माजी राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे पाटील आणि नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे आमदार डॉ. राजेश पाडवी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

दिलेले निवेदन – 

या वेळी श्री. प्रवीण पोटे पाटील म्हणाले, ‘‘यासंदर्भात मी लक्षवेधी सूचना मांडून सरकारकडून उत्तर मागवीन.’’ डॉ. राजेश पाडवी म्हणाले की, यासंदर्भात मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करीन.तुळजापूर मंदिर प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने अमरावती येथील विधान परिषदेतील भाजपचे आमदार तथा माजी राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे पाटील आणि नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे आमदार डॉ. राजेश पाडवी, तसेच आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांना निवेदन दिले.

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट (डावीकडे)
आमदार डॉ. राजेश पाडवी यांना निवेदन देतांना श्री. श्रीकांत पिसोळकर (उजवीकडे)
आमदार श्री. प्रवीण पोटे पाटील यांना निवेदन देतांना श्री. श्रीकांत पिसोळकर (डावीकडे)
आमदार श्री. भरतशेठ गोगवले यांना निवेदन देतांना श्री. सुनील घनवट (डावीकडे)

आमदार भरतशेठ गोगावले यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र !

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी श्री. सुनील घनवट यांनी शिंदे गटाचे मुख्य प्रतोद (पक्षशिस्तीच्या पालनाचे दायित्व असणारा) आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांना निवेदन दिले. या वेळी श्री. भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन तुळजापूर मंदिर घोटाळ्याची चौकशी पुन्हा चालू करण्याची अन् दोषींवर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे.