साहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही चालू !- चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

विधान परिषद लक्षवेधी

श्री. चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन साहाय्यक प्राध्यापक संवर्गातील भरतीसाठी वित्त विभागाने ४० टक्के पदांना मान्यता दिली आहे. त्यानुसार पदभरतीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही चालू आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. साहाय्यक प्राध्यापक भरतीविषयी सदस्य महादेव जानकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

श्री. पाटील यांनी सांगितले की, साहाय्यक प्राध्यापकांच्या ३ सहस्र ५८० पदांना उच्चस्तरीय समितीने स्थगिती उठवून संमती दिलेली आहे. यांतील १ सहस्र ४९२ पदे भरण्यात आलेली आहेत. शिवाय २१९ पदांच्या भरतीस शासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. २ सहस्र ८८ साहाय्यक प्राध्यापक यांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथील केले असून ही भरतीही लवकरच केली जाईल. यामध्ये सेट, नेट, पी.एच्.डी., एम्.फील. झालेल्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जानेवारी २०२३ मध्ये शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा साहाय्यक पदाची मान्यता घेऊन १०० टक्के पदभरती प्रक्रिया राबवू. तासिका तत्त्वावरील प्राध्यापक यांच्या मानधनात वाढ करून ६५० रुपये केले आहे. त्यांचे मानधन वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले जातील.