शत्रूला कळायला हवे कोणतेही युद्ध नक्कीच संपते !  

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे युक्रेन समवेतच्या युद्धाविषयी विधान !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

कीव (युक्रेन) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रनेसमवेतचे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की अमेरिकेच्या दौर्‍यानंतर पुतिन यांनी हे विधान केले आहे. या युद्धाला १० मासांहून अधिक कालावधी लोटला आहे.

पुतिन प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हटले की, हा संघर्ष संपवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही करत राहू.  कोणत्याही मार्गाने का असेना, सर्व संघर्ष संपुष्टात येतात. आपल्या शत्रूला हे जितक्या लवकर समजेल तितके चांगले.’ या वेळी पुतिन यांनी अमेरिका रशियाला दुर्बल करण्यासाठी युक्रेनचा वापर करत असल्याचा आरोप केला.

युद्ध संपवण्यासाठी रशियाला गांभीर्य दाखवावे लागेल ! – अमेरिका

पुतिन यांच्या विधानानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते जोन किर्बी यांनी म्हटले की, पुतिन यांनी कोणत्याही प्रकारच्या करारासाठी सिद्ध असल्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. युक्रेनमध्ये पुतिन जे करत आहेत ते युद्ध संपवण्याच्या त्यांच्या दाव्याच्या अगदी उलट आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांच्याशी चर्चेसाठी सिद्ध आहेत; मात्र त्यासाठी रशियाला गांभीर्य दाखवावे लागेल.