सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळये (वय ८६ वर्षे) (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री) यांची सेवा करतांना झालेल्या भावस्थितीविषयी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगत असतांना साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी

१. साधिकेने पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी यांची सेवा भावपूर्ण केल्याबद्दल श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकेचे कौतुक करणे

‘मी पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री) यांच्या सेवेत होते. देवाने माझ्याकडून त्यांची सेवा भावपूर्ण करून घेतली. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सेवेसंदर्भात माझे ४ – ५ वेळा कौतुक केले. त्या वेळी मी त्यांना म्हणाले, ‘‘ताई, मी ही सेवा केली नाही. देवाने माझ्याकडून ही सेवा करून घेतली.’’ मी त्यांना असे सांगत असतांनाही माझा भाव जागृत झाला आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.

सौ. सुजाता सावंत

२. रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करतांना ‘रुग्णालयात पू. आजींची सेवा करत आहे’, असे दृश्य दिसणे आणि साधिकेला स्वतःच्या हातांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे

मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत असतांना माझ्या डोळ्यांसमोर ‘मी रुग्णालयात पू आजींची सेवा करत आहे’, असे दृश्य तरळत असते. एकदा मी स्वयंपाकघरात एक सेवा करत असतांना ते रुग्णालयातील दृश्य माझ्या डोळ्यांसमोर तरळत होते. तेव्हा मी माझ्या दोन्ही हातांचे पंजे छातीसमोर धरून त्या हातांकडे एकटक पहात होते आणि मनात म्हणत होते, ‘या दोन्ही हातांनी पू. आजींची सेवा केली. या हाताच्या बोटांनी सेवा केली.’ नंतर मी दोन्ही हातांचे पंजे कृतज्ञताभावाने माझ्या तोंडवळ्यावरून दोन वेळा गोलाकार फिरवले. त्या वेळी मला माझ्या हातांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. नंतर मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींशी मनातून संवाद साधू लागले.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि तिने अनुभवलेली भावस्थिती !

३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन होणे अन् साधिकेचे अवयव आणि इंद्रिये यांनी तेथे उपस्थित रहाणे : मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) सूक्ष्मातून सांगितले, ‘गुरुदेवा, पू. हिरा मळ्येआजींची सेवा मी केली नाही, तर ती माझ्या अवयवांनी केली.’ त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले उंच आसनावर बसले आहेत. त्यांच्या चरणांशी उजव्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि डाव्या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसल्या आहेत. मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या शेजारी बसले आहे. पू. आजींच्या सेवेत असणारे माझे सर्व अवयव (दोन्ही हात, पाय, डोळे, डोके, मन आणि बुद्धी) गोलाकार बसले आहेत.

३ आ. ‘साधिकेचे अवयव आणि इंद्रिये यांनी रुग्णालयात पू. आजींची सेवा कशी केली ?’, याचे दृश्य साधिकेच्या डोळ्यांसमोर तरळणे आणि ‘सेवेत चैतन्य आणि आनंद मिळाला’, असे साधिकेने परात्पर गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगणे : तेव्हा ‘माझे अवयव आणि इंद्रिये यांनी रुग्णालयात पू. आजींची सेवा कशी केली ?’, याचे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर हळूवारपणे येत होते. माझे दोन्ही हात आणि पाय पटापट सेवा करत होते. माझे दोन्ही डोळे ‘पू. आजींची सेवा कशी करायची ?’, याविषयी माझ्या मनाला सांगत होते. माझे मन आणि बुद्धी पटापट निर्णय घेऊन सेवा करत होते. ‘तेव्हा हे अवयव मला सेवेतील चैतन्य आणि आनंद देत होते’, असे मी परात्पर गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सूक्ष्मातून सांगत होते.’ त्या वेळी मी एक ते दीड घंटा भावस्थितीत होते.

३ इ. तिन्ही गुरूंकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात साधिकेचे सर्व अवयव न्हाऊन निघणे : पू. आजींची सेवा करत असल्याचे दृश्य पहात असतांना माझे सर्व अवयव तिन्ही गुरूंकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात न्हाऊन निघत होते. तेव्हा मला स्वतःचा विसर पडला होता. नंतर मी गुरुदेवांना सांगितले, ‘प.पू. गुरुदेवा, ही सेवा मी केली नाही, तर देवानेच माझ्याकडून ही सेवा करून घेतली.’ नंतर मी कृतज्ञता व्यक्त केली.

४. ‘साधिकेला दैवी कण दिसणे, ‘गुरुदेवांच्या चरणांपर्यंत सेवा पोचली आणि ते समवेत आहेत’, याची साधिकेला प्रचीती येणे

नंतर माझ्या सेवेची वेळ संपल्यावर मी स्वयंपाकघरातील आवराआवर केली. मी तेथील केर काढून सुपलीत भरला. तेव्हा त्या केरात मला विविध रंगाचे असंख्य दैवी कण दिसले. मी सौ. सायली करंदीकर (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची मुलगी) यांना ते कण दाखवले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हे दैवी कण आहेत.’’ तेव्हा ‘माझी सेवा गुरुदेवांच्या चरणांपर्यंत पोचली आणि ते माझ्या समवेतच आहेत’, याची प्रचीती देवाने दिली’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.

 ५. ‘प्रत्येक सेवा भावाच्या स्तरावर केल्यावर देव आपल्या समवेत असतो’, हे माझ्या लक्षात आले.

६. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘देवाने मला संतसेवेची पुनःपुन्हा संधी द्यावी’, अशी मी आर्तभावाने प्रार्थना करते.

देवा, तू ही अनुभूती माझ्याकडून लिहून घेतलीस. त्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक