सर्वाेच्च भक्तीचे मूर्तीमंत उदाहरण असलेले कारवार (कर्नाटक) येथील सुप्रसिद्ध मूर्तीकार पू. (कै.) नंदा आचारी (वय ८२ वर्षे)!

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही काही साधक सेवेनिमित्त कर्नाटक येथे गेलो होतो. त्या वेळी कारवार येथील संत पू. नंदा आचारी यांच्याशी आमची प्रथम भेट झाली. या भेटीत भक्ताच्या (पू. नंदा आचारी यांच्या) रूपामध्ये मला प्रत्यक्ष देवाचेच दर्शन झाले. ११.१२.२०२२ या दिवशी पू. नंदा आचारी यांनी कारवार येथे देहत्याग केला. २२.१२.२०२२ या दिवशी पू. नंदा आचारी यांचा देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू.  नंदा आचारी

१. प्रथम भेटीत पू. आचारी यांच्या डोळ्यांतील भाव पाहून साधकांची भावजागृती होणे आणि ‘भक्त अन् देव हे एकरूप असतात’, याची प्रचीती येणे

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटक येथे सेवेनिमित्त गेलो असतांना चित्रीकरणानंतर आमच्याकडे थोडा वेळ होता. त्या वेळी तेथील एक स्थानिक साधक आम्हाला म्हणाले, ‘‘येथे एक मूर्तीकार आहेत.’’ त्यानंतर ते आम्हाला पू. नंदा आचारी यांच्याकडे घेऊन गेले. त्या वेळी ‘अत्यंत साधे रहाणीमान असलेले पू. आचारीमामा जणू साधकांची अनेक वर्षांपासून वाट पहात आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या डोळ्यांतील ते भाव पाहूनच आम्हा सर्वांची भावजागृती झाली. ‘भक्त आणि देव हे एकरूप असतात. जेथे देव आहे, तेथे भक्त आहे आणि जेथे भक्त आहे, तेथे देव आहे’, याची मला त्या दिवशी प्रचीती आली.

सौ. प्रियांका गाडगीळ

२. एका व्यक्तीकडून एका जुन्या ध्वनीमुद्रिकेसाठी (ग्रामोफोनसाठी) पुष्कळ पैसे मिळत असूनही पू. आचारी यांनी त्या व्यक्तीला ती न विकता सनातनच्या संग्रहालयासाठी देणे

आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर त्यांच्याशी बोलतांना त्यांनी आम्हाला त्यांच्याकडील अत्यंत जुनी ध्वनीमुद्रिका (ग्रामोफोन) आश्रमातील संग्रहालयात ठेवण्यासाठी दिली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी २७ सहस्र रुपये देऊन ही ध्वनीमुद्रिका विकत घेण्यासाठी माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. त्या वेळी ‘ही ध्वनीमुद्रिका त्या व्यक्तीला न देता अधिक योग्य ठिकाणी देऊया’, असा विचार माझ्या मनात आला. आज तुम्ही माझ्याकडे आला आहात, तर ‘ही ध्वनीमुद्रिका तुमच्या संग्रहालयासाठी द्यावी’, असे मला वाटले.’’ ‘सत्पात्रे दानम् ।’, ही संतांची सहज प्रकृती असते. ते निःस्वार्थी जीवन जगत असतात’, हे मला यातून शिकायला मिळाले.

३. रामनाथी आश्रमात स्थापन करण्यासाठीची श्री सिद्धिविनायकाची मूर्ती घडवण्यास महर्षींनी पू. नंदा आचारी यांची निवड करणे आणि पू. आचारी यांनी मूर्ती अत्यंत भावपूर्ण घडवणे

महर्षींनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री सिद्धिविनायक मूर्तीची स्थापना करण्यास सांगितले. ‘महर्षींनी सांगितलेली ही मूर्ती घडवणार कोण ?’, या संदर्भात शोध चालू होता. ‘मूर्तीकारही मूर्ती घडवण्याची सेवा भावपूर्ण करणारा असावा’, असे महर्षींनी सांगितले. अनेक नावांमधून महर्षींनी श्री सिद्धिविनायकाची मूर्ती घडवण्यासाठी पू. नंदा आचारी यांची निवड केली.

पू. आचारी यांनीसुद्धा ही मूर्ती अत्यंत भावपूर्ण घडवली. सनातनच्या इतिहासात मूर्तीकार संत पू. नंदा आचारी यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.

४. ‘भाव तेथे देव’, हे साधकांना शिकवणारे पू. नंदा आचारी !

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती सिद्ध झाल्यानंतर ती आश्रमात आणण्यापूर्वी मूर्तीचे संशोधन करण्याचे ठरले. त्यासाठी ही मूर्ती उचलून एका पटलावर ठेवायची होती आणि नंतर ती मूर्ती आश्रमात आणायचे ठरवले. ती मूर्ती उचलण्यासाठी १० साधक न्यून पडत होते. मूर्ती पुष्कळ जड झाली होती. त्या वेळी याविषयी पू. नंदा आचारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘मूर्तीकडे पाषाण म्हणून न पहाता ‘तुम्ही देवाला उचलत आहात’, असा भाव ठेवून मूर्ती उचला, म्हणजे सहज उचलली जाईल.’’ तेव्हा त्यांनी मूर्ती उचलण्याची योग्य पद्धतही साधकांना शिकवली. त्यानंतर ३ – ४ साधकच ती मूर्ती उचलू शकले. त्या वेळी त्यांनी ‘भाव तेथे देव’, हे उपस्थित सर्वांना शिकवले.

‘प.पू. रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणे सर्वाेच्च भक्तीचे उदाहरण असलेले एकमेवाद्वितीय असे मूर्तीकार संत पू. नंदा आचारी यांचा सहवास आम्हा साधकांना लाभला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. प्रियांका सुयश गाडगीळ, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१४.१२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक